पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, परीक्षेचा निकाल ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. तसेच, पुढील शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षाप्रमाणे येत्या फेब्रुवारी महिन्यात घेण्याचा प्रयत्न असून त्यासाठी येत्या १ नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असे परीक्षा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोनामुळे लांबलेली शिष्यवृत्ती परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेण्यात आली. मुंबई वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांत परीक्षा सुरळीतपणे पार पडली. कोरोनामुळे मुंबईत परीक्षा झाली नाही. यंदा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील ३ लाख ८८ हजार ४९८ विद्यार्थ्यांनी, तर आठवीसाठी २ लाख ४४ हजार ३२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामुळे राज्यातील एकूण ६ लाख ३२ हजार ८२५ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. परीक्षा परिषदेतर्फे अंतरिम उत्तर सूची व त्यानंतर अंतिम उत्तर सुरू जाहीर करण्यात आली आहे. सध्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
दर वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेस सुमारे दहा ते बारा लाख विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होतात. मात्र, कोरोनामुळे शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा अनेकदा पुढे ढकलावी लागली. परंतु, या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांनी त्या दृष्टीने तयारी सुरू करावी. विद्यार्थ्यांना येत्या नोव्हेंबरपासून शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
-------------------
पुण्यातून शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
इयत्ता पाचवी : ३५, १५९
इयत्ता आठवी : १७,१३४
एकूण विद्यार्थी : ५२,२९३