पुणे : राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या १२ ऑगस्ट रोजी घेतल्या जाणाऱ्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान विद्यार्थी, पालक, शिक्षक व परीक्षा केंद्र प्रमुखांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे. पहिला पेपर संपल्यानंतर व परीक्षा संपल्यावर कोणीही परीक्षा केंद्र परिसरात गर्दी करू नये. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रातून बाहेर पाठवताना एका-एका वर्गातील विद्यार्थ्यांना पाठविण्याचे नियोजन करावे, अशा सूचना परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिल्या आहेत.
राज्यातील इयत्ता पाचवीच्या ३ लाख ८८ हजार ४०५ विद्यार्थ्यांची तर आठवीच्या २ लाख ४४ हजार २६० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा एकूण ५ हजार ६८७ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. त्यात पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक ५२ हजार २६८ विद्यार्थी ४९९ परीक्षा केंद्रावर देणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे सहा ते सात वेळा पुढे ढकलण्यात आलेली शिष्यवृत्ती परीक्षा अखेर येत्या गुरुवारी घेतली जाणार आहे. कोरोनामुळे सर्व परीक्षा केंद्र स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच एका बाकावर एक आणि एका वर्गात केवळ २० विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे, असेही सुपे यांनी सांगितले.
------------------
परीक्षा परिषदेने काय दिल्या सूचना
* शासनाने कोरोनाविषयक वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे .
* परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याने मास्क परिधान केल्याची खात्री करावी.
* प्रत्येक परीक्षार्थी विद्यार्थ्याला हात सॅनिटाईज करूनच परीक्षा केंद्रात प्रवेश द्यावा.
* परीक्षा केंद्रवर पहिल्या पेपर पूर्वी, मध्यंतरावेळी व परीक्षेनंतर विद्यार्थी घोळका करून थांबणार नाहीत ; एकमेकांच्या संपर्कात येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
* केंद्र संचालकाने परीक्षा केंद्राच्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची किंवा खासगी डॉक्टरची माहिती स्वत:कडे ठेवावी.
------------------