पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची संधी ‘ईरासमस प्लस’ या प्रोजेक्ट अंतर्गत उपलब्ध झाली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपही देण्यात येणार आहे. त्याचबरोबर परदेशी विद्यापीठातील विद्यार्थी ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षणासाठी येऊ शकणार आहेत.युरोपीय संघाच्या ‘ईरासमस प्लस’ हा प्रकल्प राबविला जातो. सामाजिक क्षेत्रात नवीन उपक्रम तयार करून नवे उद्योजक तयार करण्यासाठी हा प्रकल्प युरोपियन संघाच्या वतीने राबविण्यात येतो. या प्रकल्पांतर्गत पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. परदेशामध्ये सहा महिन्यांचे एक सत्र त्यांना पूर्ण करता येणार आहे. तिथे जाण्याचा व राहण्याच्या खर्चासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली. यावेळी प्रभारी कुलसचिव अरविंद शाळीग्राम, आंतरराष्टÑीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे उपस्थित होते.इस्राईलचे आंतरविद्याशाखा प्रणाली केंद्र (हरजेलिया) हे याचे मुख्य संयोजक आहेत. इस्राइलमधील ओरेनीम कॉलेज आॅफ एज्युकेशन, किब्बज, सफायर अॅकेडमिक, तेल-हाय अॅकेडमिक कॉलेज साकलेन, जर्मनीतील टेक्निशियन विद्यापीठ (बर्लिन), ईडनबर्ग विद्यापीठ (इंग्लंड), वेलशेस वेन (क्रोएशिया), टेक्निको विद्यापीठ (पोर्तुगाल), कलिंगा विद्यापीठ (ओरिसा) यांचा यामध्ये समावेश आहे.विजय खरे यांनी सांगितले, ‘‘युरोपीय संघाच्या एज्युकेशन युरो कल्चर अंतर्गत ‘सोसायटी, पॉलिटिक्स अँड कल्चर इन ग्लोबल काँटेक्स्ट’ याअंतर्गत संयुक्त पदवी देण्यात येणार आहे. त्यामध्ये भारतातून केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश आहे. जगभरातील १५ विद्यापीठे एकत्र येऊन संयुक्त पदवी अभ्यासक्रमाचे आदान-प्रदान करणार आहेत. यामुळे पुणे विद्यापीठाचे नाव जागतिक पातळीवर जाण्यास मदत मिळणार आहे.’’आंतरराष्टÑीय केंद्राच्यावतीने नुकतेच स्पेन येथील स्टॅनटिगो डे कम्पोस्टेला, रूमानियातील गलाथी व सायप्रसमधील सायप्रस विद्यापीठ यांच्यासोबत सांमजस्य करार केले आहेत. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक यांचे शैक्षणिक आदान-प्रदान केले जाणार आहे. अमेरिकेतील पेनसेल्वनिया स्टेट विद्यापीठासोबत केलेल्या करारा अंतर्गत ७५ हजार डॉलरच्या प्रकल्पावर संयुक्तपणे काम करण्यात येत आहे.यंदा सर्वाधिक परदेशी विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेशसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात पारंपरिक अभ्यासक्रमासाठी ७५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आतापर्यंत पारंपरिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येचा हा उच्चांक आहे.
परदेशी विद्यापीठांमध्ये जाण्यासाठी स्कॉलरशिप, करारांतर्गत होणार देवाण-घेवाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 5:13 AM