लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम तीन महिने उलटून गेले तरी मिळालेली नाही. शहरातील सुमारे ११ हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे.शहरातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी आणि त्यात खंड पडू नये, यासाठी महापालिकेकडून मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजनेंतर्गत दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार, तर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक योजनेंतर्गत बारावीतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजारांची शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी सर्वसाधारण गटासाठी ८० टक्के, तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के गुणांची अट आहे. अर्ज करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी ही शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, शिष्यवृत्तीचा धनादेश हातात पडेपर्यंत दरवर्षी जानेवारी ते फे्रबुवारी महिना उजाडतो. चालू वर्षी मात्र मे महिना जवळपास संपत आला आहे. तसेच आता दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होतील, असे असताना मागील वर्षाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकलेली नाही. चालू वर्षी या शिष्यवृत्तीसाठी ११ हजार ९९५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यात दहावीच्या तब्बल ९ हजार ५४६, तर बारावीच्या २ हजार ४४९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. येत्या आठवडाभरात विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे धनादेश दिले जातील, असा दावा नागरवस्ती विभागाकडून करण्यात आला आहे.
‘शिष्यवृत्ती देता का, कोणी शिष्यवृत्ती’
By admin | Published: May 27, 2017 1:33 AM