अफगाणी व अन्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
“देशातील इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) संस्थेअंतर्गत अफगाणिस्थानसह नेपाळ, भूतान, युगांडा, आफ्रिका, घाना आदी ७० ते ८० देशांतील विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. आयसीसीआरच्या माध्यमातून अफगाणिस्तानातून सुमारे एक हजार विद्यार्थी दरवर्षी शिक्षणासाठी भारतात येतात. गेल्या तीन ते चार वर्षांत एकट्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुमारे अकराशे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. हे विद्यार्थी पुण्यात, भारतातीत अन्य शहरांमध्ये शिक्षण घेऊन अफगाणिस्थानात परततात. तिथे गेल्यानंतर त्यांनी भारताचे ‘ब्रॅण्ड अॅम्बेसिडर’ म्हणून काम करावे अशी अपेक्षा असते. यापूर्वी भारतातून शिक्षण घेऊन गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीत महत्त्वाची भूमिका निभावली आहे.”
अफगाण्यांचे भारत वास्तव्य
-गेल्या काही वर्षांपासून भारत सरकारने व देशातील विद्यापीठांनी सर्व परदेशी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांना रमजान, ईद, दिवाळी, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून एकत्र आणत धार्मिक दहशतवादापासून दूर ठेवले आहे.
-एखादा ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात शिक्षण घेण्यासाठी येतो. तेव्हा त्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्यातून तो स्वत:चा आणि आपल्या कुटुंबाचा, परिसराचा विकास करण्याचा विचार करतो. तसेच काहीसे अफगाणी विद्यार्थ्यांच्याबाबत घडते. अफगाणिस्तान भारताच्या तुलनेत अविकसित आहे. त्यामुळे अफगाणी विद्यार्थ्यांना भारतात आल्यानंतर येथील लोकशाही, सर्वधर्म समभाव या मूल्यांसह जागतिक स्तरावर घडामोडींचे भान येते. नव्या गोष्टी शिकता येतात.
शब्दांकन - राहुल शिंदे