लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील लीला पूनावाला फाऊंडेशनच्या वतीने आतापर्यंत ११ हजार विद्यार्थिनींना
शिष्यवृत्ती दिली जात आहे. यापुढे देशभरातील विविध राज्यातील गरीब, गरजू मुलींना स्वावलंबी बनविण्यासाठी शिष्यवृत्ती सुरू करणार आहे, असे फाऊंडेशनच्या कार्याध्यक्षा लीला पूनावाला यांनी दिली़.
कॅम्प एज्युकेशन सोसायटी आणि लीला पुनावाला फाऊंडेशनच्या वतीने दहावी आणि
बारावीतील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार तसेच धान्य वाटपाचा कार्यक्रम
आयोजित केला होता. याप्रसंगी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांना सामाजिक कार्याबद्दल फिरोज पूनावाला यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले. फिरोझ पूनावाला आणि लीला पुनावाला यांना सोसायटीच्या वतीने सन्मानपत्र दिले. यावेळी फाऊंडेशनने दत्तक घेतलेल्या ४० विद्यार्थिनींना स्मार्ट फोन आणि अन्नधान्याचे किट दिले.
याप्रसंगी फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त फिरोझ पूनावाला, फाऊंडेशच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी प्रीती खरे, बाबूराव जवळेकर, उदय पुंडे, सुभाष अगरवाल, डॉ. आय. एस. मुल्ला, अॅड. भगवान बेंद्रे, शशिकांत पवार, मुख्याध्यापिका दुर्गा देशमुख उपस्थित होते.
वालचंद संचेती म्हणाले की, आधुनिक काळाची गरज ओळखून संस्थेने ‘स्किल
डेव्हलपमेंट सेंटर’ सुरू केले आहे. या सेंटरमध्ये समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायाभिमुख शिक्षण देण्यात येत आहे. कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या तिन्ही शाळांमधून ५७३ आर्थिकदृष्टया दुर्बल व गरजू विद्यार्थिनींना लीला फाऊंडेशनतर्फे दत्तक घेण्यात आले आहे. या मुलींना ७ वी पासून ते पदवी शिक्षणापर्यंत फाऊंडेशनतर्फे
शिष्यवृत्ती दिली जात आहे.
-----
अन्य राज्यांमधील मुलींना मदत करणार
शहरातील तीन हजार गरजू कुटुंबीयांना धान्यवाटप केले जाणार आहे. तसेच विविध शाळांमधील एक लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच पेन दिले जाणार आहेत. फाउंडेशनने आता
अन्य राज्यांमधील मुलींना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. लवकरच बेंगलोर येथे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर चेन्नई येथे फाऊंडेशनचे कार्यालय सुरू करण्याचा मानस आहे, असे याप्रसंगी फिरोज पूनावाला यांनी सांगितले.