लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाने २३ नोव्हेंबरनंतर शाळा सुरू करण्याचे आदेश काढल्यानंतर शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या. परंतु, दिवाळीपश्चात कोरोना साथीची दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. ‘शाळा बंद’चा हा कालावधी आता आणखी वाढवण्यात आला आहे.
येत्या ३ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या शाळा पुन्हा कधी उघडणार याचा निर्णय आता ३ जानेवारीनंतरच होईल. राज्य शासनाच्या आदेशांनातर पुणे पालिकेने शिक्षकांना कोविड चाचणी करून घेण्याचा सूचना केली होती. या बाबतच्या निर्णयाचे स्वातंत्र्य राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोडला होता.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठवताना पालकांकडून संमतीपत्र घेण्याची सुरुवाात महापालिकेने गेल्या महिन्यात चालू केली होती. मात्र पालकांकडून त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आता महापालिकेच्या शाळा ३ जानेवारीपर्यंत शाळा बंद राहणार असल्याने शहरातील अन्य शाळाही याच निर्णयाचे अनुकरण करण्याची चिन्हे आहेत.
चौकट
“सद्यःस्थितीत कोरोना आवाक्यात असला तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. मुलांना शाळेत पाठविण्याची पालकांचीही मानसिकता नाही. त्यामुळे येत्या ३ जानेवारीपर्यंत शाळा बंदच ठेवण्यात येतील. तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.”
-मुरलीधर मोहोळ, महापौर