वासुंदे (पुणे) : दुचाकींच्या अपघातात शाळकरी मुलगा ठार तर एक गंभीर जखमी झाला. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील हिंगणीगाडा हद्दीत अपघात झाला. शनिवार (दि ६) रोजी सकाळी ७.१५ वाजताचे दरम्यान हिंगणीगाडा येथील गोरक्ष भीमराव भंडलकर व ऋषिकेश रमेश भंडलकर हे दुचाकीवरून वासुंदे येथील श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालयात सकाळच्या शाळेत जात होता. त्यांच्या दुचाकीला हिंगणीगाडा (ता. दौंड) हद्दीतील दुभाजकाजवळ पाटसकडून बारामती बाजूस जाणाऱ्या भरधाव दुचाकीने पाठीमागून धडक दिली.
या भीषण अपघातात इयत्ता दहावीत शिकणारा गोरक्ष भंडलकर हा विद्यार्थी जागीच ठार झाला तर ऋषिकेश भंडलकर हा गंभीर जखमी झाला. या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला ज्या दुचाकीने धडक दिली तो दुचाकीस्वार हा रायडर असून त्याच्या दुचाकीचा वेग प्रचंड असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या अपघातात सदर विद्यार्थी चालवत असलेल्या दुचाकीचा चक्काचूर झाला आहे.
दरम्यान या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी संतप्त होऊन पालखी महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पाटस पोलीस चौकीचे पोलीस उप निरीक्षक सलीम शेख यांनी सहकार्यांसमवेत घटनास्थळी तातडीने धाव घेत ग्रामस्थांशी संवाद साधला व परिस्थिती पूर्व पदावर आणली.
ज्या दुभाजकाजवळ हा भीषण अपघात झाला तो दुभाजक हा चुकीचा असून त्या ठिकाणी वाहन चालकांना निदर्शनास येईल अशा कोणत्याही मार्गदर्शक सूचना अगर स्पीड ब्रेकर नसल्याने या नियमबाह्य़ दुभाजकामुळेच हा गंभीर अपघात झाला असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला असून हा दुभाजक बंद करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गोरक्ष हा त्याच्या आई वडीलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहीण आहेत. कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून गोरक्ष याच्या जाण्याने भंडलकर कुटुंबावर फार मोठा आघात झाला आहे. या घटनेने हिंगणीगाडा परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.