बारामती : बारामती, इंदापूर व दौंड तालुक्यातील शालेय स्कूल बसची तपासणी कराण्याचे आवाहन उप-प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. १५ जूननंतर अशा वाहनांमध्ये काही त्रुटी अढळल्यास वाहनजप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उप-प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आला आहे.उप-प्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या आवाहनानुसार, ‘सुरक्षित विद्यार्थी वाहतूक’ करण्यासाठी वाहनाची तपासणी करून घ्यावी; तसेच आपले वाहन हे शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीनुसार असणे आवश्यक आहे. आपल्या वाहनाचा विमा, कर, परवाना आदी वैध कागदपत्रे जवळ बाळगावीत; तसेच अग्निशमन यंत्र, मुलींची वाहतूक करणाऱ्या वाहनामध्ये महिला मदतनिसाची नेमणूक करणे अनिवार्य आहे. आपले वाहन हे वरील अटींची पूर्तता करत नसल्यास उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती या ठिकाणी आपल्या वाहनाची तपासणी करून घ्यावी, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनांची कडक तपासणी दि. १५ जून २०१८ पासून करण्यात येईल. तरी यामध्ये काही त्रुटी आढळल्यास वाहन तपासणीदरम्यान आपले वाहन जप्त करण्यात येईल. विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यास मोटार वाहनमालक-चालक व सदर शाळा जबाबदार राहील.इंदापूर, दौंड व बारामती तालुक्यांतील शाळाप्रमुख, मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेमध्ये परिवहन समितीची स्थापना केली नसल्यास त्वरित करावी व तसा शालेय परिवहन समितीचा फलक आपल्या शाळेमध्ये दर्शनी भागामध्ये सर्वांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे आवश्यक आहे. सदर समिती स्थापन केल्यानंतरचा अहवाल बारामती उप-प्रादेशिक परिवहन अधिकाºयांना सादर करण्याची सूचनादेखील देण्यात आली आहे.खासगी, अवैध वाहनांचा वापर टाळा...काही गैरसमजामुळे शालेय व्यवस्थापन स्कूलबसच्या मालकासोबत करार करण्यास कचरत आहेत. तरी शालेय व्यवस्थापकांनी असा करार केल्यामुळे सदर स्कूलबसला विद्यार्थी वाहतुकीसाठी आवश्यक असणारा परवाना घ्यावा, जेणेकरून शालेय व्यवस्थापनावर पुढील कोणतीही कायदेशीर जबाबदारी राहत नाही. तरी शालेय व्यवस्थापनाने स्कूलबसच्या मालकाबरोबर करार करावेत; तसेच सर्व पालकवर्गांनी आपली मुले वैध शालेय परवाना असलेल्या स्कूलबसमधूनच पाठवावीत. खासगी व अवैध वाहनांचा वापर टाळावा. - अनिल वळिव, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती.