कोरेगाव भीमा, दि. 20 : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथिल कमळीच्या मळ्याजवळ कोरेगाव भीमातील ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शालेय विद्यार्थ्यांच्या बसचा स्टिअरिंग रॉड निखळल्याने बसवरील नियंत्रण सुटून ती ओढ्यात उलटली. या वेळी बसमधील ५२ पैकी २० मुलांना दुखापत झाली, तर ५ मुले गंभीर जखमी आहेत. पाण्यात बुडालेल्या बसमधील मुलांना स्थानिक तरुणांनी बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. बसची वेळेवर दुरुस्ती होत नसल्याची व याच बसचा ६ महिन्यांपूर्वीही स्टिअरिंग रॉड निखळूनही शाळा व्यवस्थापनाने गांभीर्याने न घेतल्यानेच पुन्हा दुर्घटना घडल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील अल्-अमीन फाउंडेशनची ग्लोरी इंग्लिश मीडियम शाळा असून तेथे सुमारे अकराशे विद्यार्थी शिक्षण घेतात. संस्थेच्या १३ व १५ खासगी बस अशा २८ बसमधून मुलांची ने-आण करण्यात येते. बुधवारी (दि. २०) सकाळी शाळेच्या बसमधून (एमएच १२-एफसी ३०५९) संतोष गाडेकर हे चालक मुलांना शाळेत आणण्यासाठी वढू, राणोबावाडी, आपटी, संगमवस्ती, पोल्ट्री रोड, गायरान यामार्गे माळवस्ती, आरगडेवस्ती येथून मुलांना घेऊन सकाळी पावणेनऊच्या सुमारास कमळीच्या मळ्याजवळ आले. बसचा स्टिअरिंग रॉड निखळल्याचे गाडेकर यांच्या लक्षात आले. त्यांनी मुलांना बसमधील सुरक्षा पाईपला घट्ट पकडण्यास सांगितले. मात्र, तोपर्यंत बसवरचा ताबा सुटल्याने ती ओढ्यात उलटली. ओढ्यात खूप पाणी असल्याने ती पाण्यात अर्धी बुडाली होती. बस ओढ्यात उलटल्याचे परिसरातील राहुल भंडारे, विठ्ठल भंडारे, नितीन खैरे, अंकित शिवले, संभाजी भंडारे व इतर ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ बसकडे धाव घेतली.
बसमध्ये पुढे बसलेल्या प्रतीक शहाजी भंडारे या मुलाला बसचा दरवाजा उघडण्यास राहुल भंडारे या तरुणाने सांगितल्यावर बसचा चालकाच्या बाजूचा दरवाजा उघडून प्रथम ५ मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर चालकाच्या सीटमागील हेडरेस्टने बसची पुढची काच फोडण्यात आली. बसमधील उरलेल्या मुलांना बाहेर काढण्यात आले.
मात्र, बसमध्ये किती मुले आहेत, याचा अंदाज येत नसल्याने तरुण हतबल झाले असतानाच बसच्या मागे सीटखाली एक मुलगा अडकल्याचे लक्षात आल्यानंतर मुलाला बाहेर काढण्यात आले. दरम्यान, चालकाने शाळेत फोन करून मदतीसाठी दुसरी बस मागावून घेतली. सर्व मुले पाण्यात बुडाली असल्याने थंडीने गारठून गेली होती. त्यामुळे स्थानिकांनी मोठी शेकोटी पेटवून मुलांना ऊब देण्याच प्रयत्न केला. दुसरी बस आल्यानंतर सर्व मुलांना उपचार करण्यासाठी वढू येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आले.
जखमी वेद भाऊसाहेब भंडारे, गौरव प्रताप भंडारे, प्राची सुरेश भंडारे, आर्यन अंकुश भंडारे व इतरांना गंभीर असल्याने टाके घालण्यात आले. जखमीमध्ये ४ वर्षांपासून १५ वर्षांपर्यंत मुले होती. पालक युवराज भंडारे यांच्या फिर्यादीवरून बसचा चालक संतोष भंडारे यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदिविला असून शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे हे पुढील तपास करीत आहेत.
सहा महिन्यांपूर्वीही याच बसचा स्टिअरिंग रॉड निखळला होता
ग्लोरीची जी बस आज ओढ्यात उलटाली त्याच बसचा सहा महिन्यांपूर्वी वढू-आपटी रस्त्याजवळील ओढ्याजवळच स्टिअरिंग रॉड निखळला होता. मात्र, बस ओढ्याजवळील चढावर थांबली होती. त्यानंतर बस तात्पुरती दुरुस्त करण्यात आली होती. याची कल्पना मुख्याध्यापकांना दिली असल्याचे पालक भाऊसाहेब भंडारे यांनी सांगूनही गांभीर्याने न घेतल्याने त्याच बसचा सहा महिन्यांनंतर आज पुन्हा तोच रॉड निखळल्याने बसकडे शाळा व्यवस्थापन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून मुलांच्या जिवाशी खेळत असल्याची तक्रारही ग्रामस्थ करीत आहेत.
३५ आसनांच्या बसमध्ये ५२ विद्यार्थी
बसमध्ये ३५ आसनांची क्षमता असूनही प्रत्यक्षात ५२ मुलांना प्रवास करण्याठी शाळा नेत असून काही मुलांना दीड-दीड तास पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन उभे राहूनच प्रवास करावा लागतो. बसचे पैसे मात्र पूर्णच शाळा व्यवस्थापन घेत असूनही बसची निगा राखत नसल्याची टीका या वेळी संत्पत पालकांनी केली.
पाच तरुण बनले मुलांसाठी देवदूत
ग्लोरीची बस ओढ्यात मुलांसह उलटल्याचे राहुल भंडारे, विठ्ठल भंडारे, नितीन खैरे, अंकित शिवले व संभाजी भंडारे या तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ बसकडे धाव घेऊन बसची काच फोडून स्वत:चा जीव धोक्यात घालून बसमधील ५२ मुलांना तत्काळ सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. मुलांना बाहेर काढणारे हे ५ तरुणांसह इतर शाळकरी मुलांसाठी देवदूतच ठरले असल्याने मोठा अपघात टळला.
मुलांना शालेय साहित्यासह नवीन गणवेश मिळणार
रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब असल्याने बसचा स्टिअरिंग रॉड तुटल्याने बस ओढ्यात उलटून बसमधील ५२ मुलांची दप्तरे, सर्व शालेय साहित्य व गणवेश खराब झाले असल्याने शाळा व्यवस्थापनामार्फत सर्व मुलांना शालेय साहित्य, दप्तर व नवीन गणवेश देणार असल्याचे अल्-अमीनचे अध्यक्ष नासीर शेख यांनी सांगतानाच बस व्यवस्था दिवाळीनंतर खासगी कंत्राटदाराकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ओढ्यावर कठडेच नाहीत
वढू सणसवाडी रस्त्यावर असलेल्या ओढ्यावर कठडे नसल्यानेच बस पाण्यात उलटली असल्याने ओढ्यांवरील कठड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून जिल्हा परिषदेकडून ओढ्यांवर कठडे बसविण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.