पुणे : शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या वाढत असून या मृतदेहांची वाहतूक करण्याकरिता शववाहिका कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे पालिकेने प्रादेशिक परिवहन विभागाकडे दहा स्कुलबसची मागणी केली होती. त्याप्रमाणे आरटीओने या स्कुल बस शववाहिका म्हणून वापरास परवानगी दिली आहे.
शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली. मार्च आणि एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढले. यासोबतच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढली. या मृतदेहांची वाहतूक करण्याकरिता पालिकेकडे उपलब्ध असलेल्या शववाहिका कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे दहा स्कुल बस (टेम्पो ट्रॅव्हलर) मिळाव्यात असे पत्र महापालिकेच्या मोटार वाहन विभागाने आरटीओला दिले होते.
त्याला प्रादेशिक परिवहन विभागाने परवानगी दिली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी याबाबतचे पत्र पालिकेला दिले असून दहा स्कुल बसही उपलब्ध करून दिल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने उपलब्ध झालेल्या या १० स्कूल बसमधील सीट काढण्यात आले आहेत. त्यामुळे या वाहनांमधून मृतदेहांची वाहतूक केली जाणार आहे. त्यामुळे शववाहिकेसाठी लागणारे वेटिंगही कमी होण्यास मदत मिळणार आहे.----पालिकेकडून वाहनाचे भाडे चालक भत्ते आणि मानधन दिले जाणार असून त्याकरीता प्रतिदिन सोळाशे रुपये भाडे दर आरटीओने ठरवून दिला आहे. त्याप्रमाणे पालिका हे भाडे अदा करणार आहे. त्यामुळे मागील वर्षभर शाळा बंद असल्याने बंद असलेला रोजगार काही प्रमाणात का होईना या स्कुल बस चालकांना मिळणार आहे.----आरटीओकडून काही सामाजिक कार्यकर्त्यांना स्कुल बस मिळवून देण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार आम्ही सर्वांनी प्रयत्न करून दहा स्कुल बस वाहने मिळवून देण्यात मदत केली. पालिकेला या काळात या वाहनांची मदत होणार असून स्कुल बस चालकांनाही रोजगार मिळणार आहे.- एकनाथ ढोले, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र, वाहतूक सेना, पुणे