पुणे : मुंबईनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक टेलिफोन असलेले शहर म्हणून पुणे प्रसिद्ध होते. मात्र, पुण्यात जसा मोबाइल आला आणि अवघ्या आठ- दहा वर्षांत पुण्यातील जागोजागी दिसणारे एस.टी.डी., पी.सी.ओ. नावालाही राहिले नाही. बीएसएनएलने ब्रॉडबॅण्ड सेवा सुरू केल्यावर लॅण्डलाइन फोनला आधार मिळाला खरा. मात्र, त्यातही खासगी कंपन्यांनी घुसखोरी केल्यावर लॅण्डलाइनची पुन्हा घसरगुंडी सुरू झाली आणि एसटीडी पीसीओप्रमाणे आता घरातही लॅण्डलाइन फोन दिसेनासा झाला. त्यामुळे आज पुण्यात अशी अवस्था झाली आहे की, पुण्यातील शाळकरी मुलांना लॅण्डलाइन फोन म्हणजे काय हे माहीतच नाही.
मोबाइल फोनमध्ये २ जीपासून ३ जी, ४ जी आणि आता ५ जीची क्रांती झाल्यानंतर आणि खासगी कंपन्यांचे ऑप्टिकल फायबरचे जाळे तयार झाल्यावर बीएसएनल लॅण्डलाइनची अवस्था अतिदक्षता विभागातील रुग्णाप्रमाणे झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत बीएसएनल कंपनी बंद झाली, तर नवल नाही, अशी प्रतिक्रिया आजच लोकांमध्ये वाटत आहे.
या डिवाइसने संपविले लॅण्डलाइनला
पेजर, मोबाइल, स्मार्टफोन, वायरलेस ब्रॉडबॅण्ड, ऑप्टिकल फायबर
ऑप्टिकल फायबरने लॅण्डलाइनचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता
मोबाइल फोन आल्यानंतर खासगी कंपन्यांचा डेटा दर न परवडणारा होता. त्यामुळे वापर असेल तेव्हाच डेटा सुरू करायचा, अशी सवय नागरिकांना होती. मात्र, गरज वाढल्यावर घरात बीएसएनलची ब्रॉडबॅण्ड सेवा सुरू करण्याची क्रेझ आली. ब्रॉडबॅण्डमुळे घरातील दोन- चार मोबाइल, कॉम्प्युटर, लॅपटॉपसह घरातील स्मार्ट टीव्हीसारखे डिव्हाइस चालायला लागले. त्यामुळे ब्रॉडबॅण्डबरोबर बीएसएनलच्या फ्री कॉलिंगसाठी लॅण्डलाइन दिसायला लागले होते. मात्र, खासगी कंपन्यांनीही घरात ब्रॉडबॅण्ड सेवा सुरू केली. त्यात ऑप्टिकल फायबरची जोडणी मिळाल्याने बीएसएनलच्या राऊटरची जागा आता खासगी कंपन्यांच्या राऊटरने घेतली आणि त्याचा परिणाम पुन्हा लॅण्डलाइनवर झाला.