पुणे : आॅनलाइन शाळा मुलांप्रमाणेच पालकांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. मुलांच्या शाळांच्या वेळा, घरातील कामाची गडबड, आॅफिसला जाण्याची किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ची लगबग सांभाळताना पालकांची कसरत होत आहे. मुलांचे आॅनलाइन क्लासमध्ये लक्ष न लागणे, अभ्यासात एकाग्रता नसणे, वाढलेला स्क्रीनटाइम, मुलांच्या अभ्यासावरून होणारे वाद, कुटुंबात निर्माण होणारा ताण यामुळे मुलांप्रमाणेच पालकांचे मानसिक आरोग्यही बिघडत चालले आहे.
कोरोनाच्या साथीमुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. मुलांचे शैैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आॅनलाइन शाळांचा पर्याय पुढे आला. आॅनलाइन शाळा हा तात्पुरता पर्याय असला तरी मुलांसाठी ही पध्दत पूर्णपणे नवीन आहे. मित्र-मैैत्रिणींशी, शिक्षकांशी प्रत्यक्ष भेट होत नसल्याने मुले कंटाळली आहेत. छोट्या स्क्रीनरूपी चौैकटीतील शाळेचा स्वीकार अजूनही त्यांच्या अंगवळणी पडलेला नाही. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मर्यादित वेळेत लेक्चर संपवायचे असल्याने शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे आॅनलाइन शाळेमध्ये मुलांच्या बऱ्याच संकल्पना स्पष्ट होत नाहीत.
---------------------
जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थिसंख्या
पहिली - १,९०,०६१
दुसरी-१,९२,५९२
तिसरी-१,९०,१३१
चौथी-१,९०,५७५
पाचवी -१,८६,९९६
सहावी -१,८३,२१४
सातवी -१,७७,८७३
आठवी -१,७०,८२२
नववी -१,६७,८६२
दहावी -१,४४,३८४२
-----------------------------------
पालकांच्या समस्या :
- दोन लेक्चरच्या मधल्या वेळेत किंवा ब्रेकमध्ये मुले काय करत आहेत यावर लक्ष ठेवावे लागते
- मुले शाळा सुरू असतानाच स्क्रीन मिनिमाइज करुन मध्येच गेम खेळतात. त्यांना सातत्याने त्यापासून परावृत्त करावे लागते.
- मुले लहान असली तर पालकांना शाळा सुरु असेपर्यंत पूर्णपणे त्यांच्याबरोबर बसून राहावे लागते. मुलांना शाळेत शिकवलेले फक्त १०-२० टक्केच समजते. ७०-८० टक्के पालकांनाच शिकवावे लागते.
- घरचे काम, आॅफिसचे काम, मुलांचा अभ्यास असा तिहेरी ताण निर्माण होतो.
---------------
मुलांच्या समस्या :
- मुलांच्या शालेय आयुष्यातील ‘ह्युमन टच’ हरवल्याने त्यातून नैैराश्य आले आहे.
- मुले कायम स्क्रीनसमोर असल्याने त्यांचे बाहेर जाणे, मित्र-मैैत्रिणींना भेटणे बंद आहे. मुले पहिल्यांदाच अशा परिस्थितीचा सामना करत आहेत.
- आॅनलाईन शाळेमध्ये संवादावर, शंका विचारण्यावर अनेक बंधने येतात. त्यामुळे अभ्यास बराचसा डोक्यावरून जातो.
- शाळेत प्रत्यक्ष जायला न मिळणे, मैैदानी खेळ बंद असणे, मित्र-मैैत्रिणींशी भेट न होणे यामुळे मुलांच्या आयुष्यात प्रचंड मर्यादा आल्या आहेत.
--------------------------
एकाच वेळी दोन्ही मुलांची शाळा असल्याने दोन मोबाईल वापरायला द्यावे लागतात. शाळा संपली तरी दिवसभर मुले मोबाईल घेऊन बसतात. स्क्रीनटाइम वाढल्याने मुलांचा चिडचिडेपणा वाढला आहे. मोबाईल थोडा वेळ काढून घेतला तरी मुले पालकांशी वाद घालतात. मुलांच्या चिडचिडेपणामुळे पती-पत्नीमध्ये खडाजंगी वाढली आहे. त्यामुळे कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडत आहे. त्यामुळे, आता प्रत्यक्ष शाळा सुरु व्हावी, असे वाटते आहे.
- अमित राऊत, पालक
------------------
सोशल गॅदरिंग नसल्यामुळे, घरून काम सुरू असल्यामुळे पालक अडकून पडले आहेत. त्यांचा राग मुलांवर निघतो आहे. मुलेही कायम स्क्रीनसमोर असल्याने त्यांचे बाहेर जाणे, मित्र-मैैत्रिणींना भेटणे बंद आहे. यातून मुलांमध्ये नैराश्य, असुरक्षितता, संभ्रम यांचे मिश्रण पाहायला मिळत आहे. पालकांनी मुलांची भावनिक आंदोलने समजून घ्यायला हवीत. भावनिकदृष्ट्या त्यांच्याबरोबर असावे. मुलांच्या स्क्रीन टाईमचे वेळापत्रक ठरवणे गरजेचे आहे. आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने मुलांना एखादे वेळी बाहेर फिरायला घेऊन जावे, त्यांच्या अडचणी संवाद साधून समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सततची चिडचिड हे नैैराश्याचे पहिले लक्षण असते. पालक किंवा मुले कोणीही निराश न होता ‘हे दिवसही जातील’ यावरील विश्वास दृढ असावा.
- डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ