शैक्षणिक जीवनात सुंदर आणि मोत्यासारख्या वळणदार हस्ताक्षराला खूप महत्त्व असते. मुलांचे अक्षर सुंदर आणि वळणदार असावे असा शिक्षक आणि पालकांचा याकडे कटाक्ष असतो. त्यासाठी लहानपणापासून सराव केला जातो. वळणदार अक्षर लिहिण्यासाठी दहावी बारावीसाठी खूप महत्त्वाचा असतो. मात्र मागील एक वर्षापासून कोरोनामुळे शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. ऑनलाईन शिक्षणाचा पर्यायी वापर करण्यात येऊ लागला आहे. यामुळे मुलांचे लिहिण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नुसते लेक्चर ऐकणे झाले आहे. नोट्स काढण्याचे प्रमाण कमी झाल्याने मुलांच्या बोटांना लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे परीक्षेत मिळणाऱ्या उत्तरपत्रिका सोडवणे मुश्कील होणार आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांनो हे करा...
दररोज मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमाच्या भाषेतील एक पान लेखन करावे. आठवड्यातून दोन वेळा घड्याळ लावून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करावा. पर्यायी पद्धतीने लेखन गती मंदावली आहे. त्यासाठी पाठाखालील प्रश्न उत्तरे सोडवावी म्हणजे गती वाढेल.
एकदम लिखाण न करता काही दिवस ठराविक आणि मोजकेच लिखाण करावे. परंतु लिखाणात सातत्य ठेवणे गरजेचे आहे.
पालकांनी आपल्या पाल्याच्या लेखनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सराव खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी त्यांना मदत करावी. त्यामुळे मुलांचे लिखाण सुंदर असण्याबरोबरच लिहिण्याची गतीही वाढेल. मराठी भाषेचे शिक्षक काय म्हणतात -
वार्षिक परीक्षा जवळ आल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचे बिघडलेले अक्षर आणि लिहिण्याची गती वाढविण्यासाठी नियमितपणे शुद्धलेखनाचा सराव करणे आवश्यक आहे. ऑनलाईन शिक्षणाने मुलांमध्ये शिथिलता आली आहे. ती घालवण्यासाठी लेखन सराव योग्य राहील. - नारायण करपे - शिक्षक.
सुंदर लेखन हे एक कौशल्य आहे. ऑनलाईन शिक्षणाने कमी लिखाण झाले आहे हे खरं आहे. पण यातूनही मुलांना लिहिण्याचा सराव राहावा यासाठी रोज अभ्यास दिला जातो. तो केला आहे की हे शिक्षक आणि पालकांनी पाहणे गरजेचे आहे. मुलांकडून पालकांनी रोज एक पान शुद्धलेखन लिहून घेतल्यास मुलांमध्ये लिखाणाची आवड निर्माण होईल. - मनोहर मोहरे - शिक्षक.
पालकांचे मत - मागील एक वर्षापासून ऑनलाईन शिक्षण मुलांना देण्यात येत असल्याने लिखाणाकडे दुर्लक्ष झाल्याने सराव कमी पडला आहे. मुले फक्त लेक्चर ऐकत आहेत. यामुळे मुलांचे हस्ताक्षर आणि गती पार बिघडली आहे. - महेश शेवकरी, पालक.
मोबाईलमुळे लेखन थांबले आहे. प्रत्यक्ष शिक्षकांचा दबाव नसल्याने मुले निवांत अभ्यास करतात. लेखन होत नसल्याने हस्ताक्षराची पार वाट लागली आहे. - राम गोरे, पालक.
-