पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याचे शाळा स्तरावरील काम पूर्ण झाले असून, सध्या शाळांकडून झालेल्या चुकांच्या दुरुस्तीचे काम विभागीय मंडळांकडून केले जात आहे. तसेच राज्य मंडळातर्फे विद्यार्थ्यांना विविध सवलतीचे गुण देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे पुढील वर्गात प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी शासनाने व राज्य मंडळाने विशिष्ट कार्यपद्धती तयार केली होती. परंतु, वेळ कमी असल्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांना निकाल तयार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. त्यात शाळांकडून काही चुकीची माहिती राज्य मंडळाकडे पाठविण्यात आली. त्यामुळे निकालास काहीसा विलंब होऊ शकतो, अशी चर्चा केली जात आहे.
------
मूल्यांकन प्रक्रियेत कोणत्या चुका?
- एका विषयाचे गुण दुसऱ्याच विषयाला दिले.
- सर्व विषयांच्या गुणांची बेरीज न करता माहिती केली सुपूर्द.
- टाईपिंग मिस्टेकमुळे विद्यार्थ्यांना दिले गेले कमी गुण.
- विद्यार्थ्यांचा अर्ज दोन वेळा नोंदविला गेल्याने दिसले पेंडिंग विद्यार्थी
---------------------
पुणे विभागातील दहावीचे एकूण विद्यार्थी : २,७१,५०३
मुले : १,५०,६९०
मुली : १,२०,७९७
मूल्यांकन झालेल्या शाळा : १०० टक्के
--------------------
शाळांनी मूल्यमापनाचे काम पूर्ण केले असून काही किरकोळ कामे बाकी आहेत. तसेच राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला जात असून, सध्या विद्यार्थ्यांना कला, क्रीडा आदी सवलतीचे गुण देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात दहावीचा निकाल प्रसिद्ध करता येऊ शकतो, असे राज्य मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
-----------------------------
अंतर्गत मूल्यमापन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विद्यार्थी परगावी गेल्यामुळे त्यांचे मूल्यमापन ऑनलाईन पद्धतीने करून घ्यावे लागले. विद्यार्थ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने काही विद्यार्थ्यांच्या घरी जावे लागले. मूल्यमापनाबाबत विद्यार्थी व पालक कोणतीही कल्पना नसल्याचे निदर्शनास आले.
- संजय सोमवंशी, मुख्याध्यापक, सुंदराबाई मराठे विद्यालय
-------------
शाळांकडून झालेल्या काही चुकांची दुरुस्ती करण्याचे काम विभागीय मंडळ पातळीवर सुरू आहे. गुण भरताना चुका होणे, सर्व विषयांची बेरीज न तपासणे, अशा चुका शाळांकडून झाल्या आहेत. मूळ कागदपत्र पाहून या चुका दुरुस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे.
- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ