पुणे : सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे शाळांची फी कमी करावी असा आदेश दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता राज्यातील खासगी शाळांसाठी फीमध्ये ५० टक्के कपात करण्याचा आदेश काढावा, अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीने केली आहे.
अध्यक्ष संजय आल्हाट यांनी सांगितले की, राजस्थान सरकार विरुध्द खासगी शाळा या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाईन शाळा, कोरोना या पार्श्वभूमीवर फी कमी करावी असा निकाल दिला आहे. त्यानंतर राजस्थान, मध्यप्रदेश, तमीळनाडू या राज्यांनी लगेच तसा निर्णय घेत फीमध्ये कपात केली.
गेले दीड वर्ष राज्यातील शालेय मुलांचे पालक अनेक आर्थिक समस्यांना तोंड देत आहेत. कोरोना टाळेबंदी काळात खासगी शाळांनी खर्च बचत होऊनही फी कमी केली नाही. राज्य सरकारने काढलेल्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले. तिथे झालेल्या निर्णयामुळे पालकांना दिलासा मिळाला नाही.
आता सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत शाळांच्या फी मध्ये ५० टक्के कपात करण्याचा आदेश काढावा अशी मागणी लोकजनशक्ती करत असल्याचे आल्हाट यांनी सांगितले.