पुणे : पाणावलेल्या डोळ्यांनी चढलेली शाळा नावाच्या जगाची पहिली पायरी... आईवडिलांना सोडून नव्या जगात झालेला प्रवेश... आणि शाळा सुटल्यानंतर पालकांना बिलगलेले चिमुकले... असे चित्र आज शहरात पाहायला मिळाले. शहरातील काही पूर्वप्राथमिक शाळांचा आज पहिला दिवस होता. या पहिल्या दिवशी लहानग्यांनी काहीशा उत्सुकतेत, पालकांना सोडून राहायचे असल्याने काहीशा दु:खात तर काहींनी अतिशय आनंदाने या नवीन प्रवासाला सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळाले. इतकेच नाही तर आपल्या पिल्लाला या नव्या जगात सोडताना पालकांचे डोळेही काहीसे पणावले होते. आपले पिल्लू कधी भेटते या आशेने पालकही शाळेच्या बाहेर वाट पाहत होते. या चिमुकल्यांच्या स्वागतासाठी शाळेतील शिक्षक आणि कर्मचारीही विशेष उत्सुक असल्याचे दिसले. शाळा, शिक्षण या नव्या जगात या पिल्लांचे स्वागत करण्यासाठी अनेक शाळांमध्ये आकर्षक पद्धतीची सजावट करण्यात आली होती. यामध्ये पपेट, बाहुल्या, कार्टून यांच्या साह्याने या चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले. नवीन गणवेश, दप्तर घेऊन शाळेत येताना रडत असलेली, पालकांना बिलगलेली मुले जाताना मात्र आपले शिक्षक आणि मित्रमंडळींचा आनंदाने निरोप घेत होती. सुरुवातीला पालकांबरोबर बसलेली मुले नंतर इतर मुलांमध्ये मिसळल्याचे प्लेग्रुपच्या शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पालकही मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाबाबत विशेष उत्सुक असल्याचे चित्र होते. आपले मूल काही काळासाठीही नजरेआड होऊ नये म्हणून पालक मुलांच्या वर्गात किंवा शाळेच्या बाहेरच थांबून होते. नर्सरीला गेलेली मुले आपल्याही नकळत आपले जुने शिक्षक, जुने मित्रमैत्रिणी आणि जुना वर्ग यांच्याकडे जात होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यायमूर्ती रानडे बालक मंदिराचा ८० वा वर्धापन दिन आणि विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुलांना आकर्षित करणारे कार्टून्स-मिकी माऊस, छोटा भीम यांनी शाळा सजविण्यात आली होती. शिवछत्रपती पुरस्कारविजेते अनिरुद्ध कुमठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.मख्याध्यापिका वर्षा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भरली चिमुकल्यांची शाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2016 4:47 AM