पुणे : राज्यातील विद्यापीठे आणि काॅलेजप्रमाणेच आता शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींनाही तीन महिने कराटेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासंदर्भात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी परिपत्रक काढावे, अशी सूचना शिक्षण आयुक्तालयातर्फे करण्यात आली आहे.
राज्य शासनाने २०१४ मध्ये तिसरे महिला धाेरण जाहीर केले हाेते. त्यातील मुद्दा क्र. ६.१३ नुसार सर्व शिक्षण संस्थांनी मुलींसाठी किमान एकदा तीन महिन्यांचा कराटे प्रशिक्षण कार्यक्रम राबवावा असे नमूद केले आहे. या संदर्भात सुराज्य निर्माण सेनेच्या महिला अध्यक्षा पुष्टी भारद्वाज यांनी शिक्षण आयुक्तालयास पत्र पाठविले हाेते. त्यामध्ये मुलींसाठी कराटे प्रशिक्षण द्यावे अशी मागणी केली हाेती.
शिक्षण आयुक्तालयातील प्रशासन अधिकारी रजनी गावडे यांनी दि. २६ फेब्रुवारी राेजी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालकांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार संचालक कार्यालयाकडून परिपत्रक काढण्यात येणार असून राज्यातील विभागीय कार्यालयांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मुलींसाठी कराटे प्रशिक्षण उपक्रम राबविण्याची सूचना दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सुमारे दीड काेटी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे मिळणार आहेत.