लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : उन्हाळ्याची दीर्घ सुटी संपून गुरुवारपासून शाळा सुरू होणार आहेत. दोन महिन्यांनंतर शाळेतल्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याची ओढ, चिमुकल्यांच्या शाळांचा पहिला दिवस, सुटी संपल्याची हुरहुर अशा भावनांच्या कल्लोळात शाळेची पहिली घंटा आज वाजेल.शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत सुसूत्रता यावी, यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून सुरू कराव्यात, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार शहरातील बहुतांश प्राथमिक व माध्यमिक शाळा गुरुवारपासून सुरू होणार आहेत. उन्हाळ्याची सुटी संपून मुला-मुलींची पावले पुन्हा शाळेकडे वळणार आहेत. विद्यार्थ्यांचा शाळेच्या पहिला दिवसाची सुरुवात आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडावी, यासाठी सर्वच शाळांतील शिक्षक, कर्मचारी, व्यवस्थापन कामाला लागले होते. त्यादृष्टीने शाळा सुरू होण्याच्या काही दिवस आधीपासूनच तयारी सुरू करण्यात आली होती.शाळेचा परिसर, वर्गखोल्या, स्वच्छतागृहांची साफसफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशी कामे शाळा सुरू होण्यापूर्वीच उरकून घेतली गेली. पहिल्या दिवशी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर शाळांच्या वर्गांमध्ये आजपासून पुन्हा किलबिलाट गुंजणार आहे. शाळा सुरू होण्यापूर्वीच बहुतांश पालकांनी विद्यार्थ्यांसाठी गणवेश, दप्तरे, वह्या-पुस्तके, रेनकोट यांची खरेदी पूर्ण केली आहे. शाळांमधून शैक्षणिक साहित्यांची विक्री करण्यास मनाई करण्यात आली असतानाही अनेक शाळांमधून ही विक्री करण्यात आली आहे. तसेच, विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्याची जबरदस्ती पालकांवर करण्यात आलेली आहे.
आजपासून बहरणार शाळा
By admin | Published: June 15, 2017 4:53 AM