पिंपरी : महापालिका शिक्षण मंडळातील पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावाने शालेय साहित्य खरेदी, विद्यार्थ्यांना साहित्य वाटपात दिरंगाई होत आहे, नियमबाह्य कामे सुरू आहेत, सभापतींची मनमानी सुरू आहे, गैरकारभाराची चौकशी करावी अशी मागणी जनजागृती सेवा संघाचे अध्यक्ष संजय रावळ, के. व्ही. रमेश यांनी आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षण मंडळास बदनाम करण्याचा प्रयत्न आहे असे सांगून सभापतींनी आक्षेपांचे खंडण केले आहे. शिक्षण मंडळाच्या वतीने महापालिका शाळेतील मुलांना शालेय साहित्य आणि गणवेश, दप्तर, बूट, रेनकाटचे वाटप केले जाते. शिक्षण मंडळ सदस्य, प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातील समन्वयाचा अभाव यामुळे मुलांना कधीही वेळेवर साहित्य मिळालेले नाही. याही वर्षी पहिल्या दिवशी केवळ पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. अधिकारांबाबतच्या मर्यादा आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे निविदाप्रक्रिया लांबल्याचे सदस्यांनी सांगितले होते. अन्य शालेय साहित्य महिनाभरात विद्यार्थ्यांना देणार असल्याचे प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितले. संजय रावळ निवेदनात म्हणतात, शिक्षण मंडळाने अट्टहास करून काही ठेकेदार कंपन्यांचे नाव टाकून १८ ते २८ मेपर्यंत वह्या, दप्तर, बूट, रेनकोट, गणवेश, फुटपट्टी अशा निविदा प्रसिद्ध केल्या. ठेकेदार पात्र नसतानाही मनमानी आणि नियमबाह्य पद्धतीने साहित्य खरेदीचा घाट घातला. अपात्र ठेकेदारांना पात्र उर्वरित साहित्य खरेदीचे काम सुरू आहे. राइट टू एज्युकेशनच्या शासन निर्णयाप्रमाणे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी साहित्य पुरविणे आवश्यक होते. शाळा सुरू होऊन आठवडा पूर्ण होईल. मात्र, अजूनही शालेय पुस्तकांव्यतिरिक्त अन्य साहित्य पोहोचलेले नाही. तसेच २०१५-१६ च्या शैक्षणिक साहित्य खरेदीची चौकशी राज्य शासनाच्या सचिवांनी लावली आहे. तसेच मंडळाने शासनास अहवाल सादर केलेला नाही. (प्रतिनिधी)निविदा प्रक्रिया ही आॅनलाइन पद्धतीने, पारदर्शकपणे असते. अतिरिक्त आयुक्त, प्रशासन अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली हे काम होत असते. त्यानंतर कामाचे आदेश निघत असतात. प्रशासनाने विद्यार्थ्यांना वेळेत आणि चांगल्या दर्जाचे साहित्य मिळावे, यासाठीच आमचा पाठपुरावा असतो. प्रशासकीय प्रक्रियेत आमचा हस्तक्षेप नसतो. आम्ही कोणालाही झुकते माप देत नाही. सर्व अधिकाऱ्यांचा एकत्रितपणे निर्णय असतो. हेतुपुरस्सरपणे जाणीवपूर्वक काही लोक माझ्यावर आरोप करतात. या गोष्टींशी माझा वैयक्तिक संबंध नाही. शिक्षण मंडळाची बदनामी करण्याचा प्रकार आहे.- धनंजय भालेकर, सभापती
शालेय साहित्य खरेदी वादाच्या भोवऱ्यात
By admin | Published: June 21, 2015 12:36 AM