लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शाळा सुरू केल्यास दररोज चार तासांची असावी. एक दिवस प्रत्यक्ष आणि एक दिवस ऑनलाईन असे वर्गांचे नियोजन करावे. सर्व शिक्षक आणि कर्मचारीवर्गाचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. शाळा सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यात अभ्यासावर भर न देता मुलांना शाळेशी जुळवून घ्यावे. या मार्गदर्शक सूचना बालरोग तज्ज्ञांच्या कृती दलाने राज्य सरकारला केल्या आहेत. हा वैद्यकीय सल्ला असून शाळा सुरू करण्याचा निर्णय पूर्णपणे राज्य सरकारचा असल्याचे या कृती दलाने स्पष्ट केले आहे.
एकटेपणामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शाळा सुरू करणे गरजेचे असल्याचे मत कृती दलाचे सदस्य आणि भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांनी व्यक्त केले. डॉ. जोग म्हणाले, “दीड वर्षापासून घरी असल्याने मुलांमधील चंचलता, आक्रमकता, आक्रस्ताळेपणा वाढला आहे. मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन कमालीचे वाढले आहे. मोबाईलमुळे मुलांना प्रत्यक्ष संवाद थांबला आहे. अनेक मुलांचे पोषणही शाळांशी संबंधित असते. त्यामुळे शाळा सुरू होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारला वैद्यकीय सल्ला दिला आहे.”
चौकट
मार्गदर्शक तत्वे :
* शाळेच्या परिसराची स्वच्छता, वर्गांचे निर्जंतुकीकरण अत्यावश्यक.
* शाळेचा प्रवेश, वर्गातील प्रवेश, स्वच्छतागृहे आणि डबा खायला बसण्याची जागा या चार ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था हवी.
* शाळा सकाळी आणि दुुपारी अशा दोन शिफ्टमध्ये भरवावी.
* शाळेमध्ये आरोग्य केंद्र सुरू करावे. तिथे थर्मामीटर, ऑक्सिमीटर, पॅरासिटॅमॉलसारख्या गोळ्या आणि प्रथमोपचार पेटी असावी. परिचारिका आणि डॉक्टरांची नेमणूक करता येईल. शाळेतील आरोग्य केंद्रात जवळच्या डॉक्टरांचा, रुग्णालयाचा, रुग्णवाहिकेचा क्रमांक नमूद करावा.
* वर्गातील हवा खेळती असावी. मुलांची बसण्याची जागा ‘सोशल डिस्टन्सिंग’चा विचारळ्रून केलेली असावी.
* शाळेमध्ये सर्वांना मास्कचा वापर अनिवार्य करावा.
चौकट
“शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शिक्षकांची सभा घेऊन विविध मुद्द्यांवर मते जाणून घेता येतील. चर्चा करता येईल, शंकांचे निरसन होईल. मुले आजारी असतील तर पालकांनी शाळेत पाठवू नये. शाळा जवळ असेल तर शक्यतो पालकांनी सोडायला जावे किंवा मुलांना चालत शाळेत पाठवावे. पहिल्या एक-दोन आठवड्यात अभ्यासावर भर न देता मुलांना शाळेशी जुळवून घेण्यास वेळ द्यावा. मुलांकडे मास्कचे तीन सेट असावेत.”
- डॉ. प्रमोद जोग, सदस्य, बालरोगतज्ज्ञ टास्क फोर्स