पुणे: राज्य शिक्षण मंडळांच्या शाळातही आता सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार आहे. सन २०२५-२६ च्या शालेय वर्षापासून त्याची कार्यवाही करण्यात येणार असून, १ एप्रिलपासून सत्राची सुरुवात होणार असल्याचे सूतोवाच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. मात्र, सीबीएसईच्या सुसंगत अभ्यासक्रमाला नव्हे तर शैक्षणिक संस्कृतीला विरोध आहे. हा बदल झाला तर दहावी बारावीचे कॅलेंडरदेखील बदलावे लागेल, असे सांगत शिक्षण क्षेत्रातून विरोध दर्शविला जात आहे.
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत असा अभ्यासक्रम २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची आणि एनईपीची अंमलबजावणी येत्या तीन वर्षांत टप्प्याटप्प्यात केली जाणार आहे. कोणताही अभ्यासक्रम लागू करायचा झाल्यास तो इयत्ता पहिलीपासूनच करावा लागतो. त्यानुसार या वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांना राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. या अभ्यासक्रमाची आखणी सीबीएसईच्या धर्तीवर करण्यात आली आहे असे शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळाकडून पहिलीची पुस्तके ‘एनईपी’च्या धर्तीवर छपाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार राज्यातील शाळा दि. १ एप्रिलपासून सुरू करण्यास शिक्षण क्षेत्रातून विरोध केला जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले म्हणाले, सीबीएसईप्रमाणे राज्याचे वेळापत्रक करणे हे चुकीचे ठरणार आहे. शालेय कामकाज हे १५ मार्चला सुरू होऊन एप्रिलअखेर संपते. सीबीएसईची शाळा प्रामुख्याने महानगरात असून, त्या शाळांची संख्या मर्यादित आहे. मात्र राज्य मंडळाच्या रचनेनुसार एप्रिल अखेर शालेय कामकाज संपते. एप्रिल ते जूनमध्ये यात्रा, जत्रांचा कालावधी असतो. विदर्भ मराठवाड्यात कडक उन्हाळ्यामुळे तिथे शैक्षणिक वर्ष दहा दिवस उशिरा सुरू होते. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून शैक्षणिक वर्ष तयार करण्यात आले आहे. नवीन बदल करायचे म्हटले तर दिवाळीची सुट्टी तशीच ठेवून दिवाळीपूर्वी ७० टक्के आणि नंतर ३० टक्के अभ्यासक्रम संपवावा लागेल. शैक्षणिक वर्ष अस्थिर झाल्याने मूल्यमापन पद्धतीत त्रुटी राहू शकतात. सीबीएसईच्या सुसंगत अभ्यासक्रमाला विरोध नाही, पण शैक्षणिक संस्कृतीला विरोध आहे. हा बदल झाला तर दहावी बारावीचे कॅलेंडरदेखील बदलावे लागेल याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.