पिंपरी : महापालिका कासारवाडी शाळेच्या २० मुलांना शाळेतून काढण्याचा निर्णय अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी घेतला. यापूर्वी माध्यमिकच्या मुलांनी शाळेत वाढदिवस साजरा करण्याच्या हेतूने वर्गात फटाके फोडून उपद्रव माजविण्याचा प्रयत्न केला होता. असाच प्रसंग शाळेत बुधवारी (दि. १६) पुन्हा करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी मुलांना शाळेतून कमी केले. शाळेची घटना समजताच प्रशासन अधिकारी आशा उबाळे, तसेच अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सहायक सुरक्षा अधिकारी विलास वाबळे शाळेत पोहोचले. पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी के ली असता, दप्तरात चाकू, मोबाइल आढळले. अतिरिक्त आयुक्तांनी तत्काळ कासारवाडी शाळेच्या २० विद्यार्थ्यांचे दाखले सुपूर्त केले. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत उपद्रव माजवला होता. दहावीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याचा वाढदिवस पुन्हा साजरा करण्याचा प्रयत्न केला गेला. विद्यार्थ्यांनी वर्गात आगीचे गोळे टाकून इतर विद्यार्थ्यांना त्रास होईल, असा प्रकार केल्याने शिक्षकही भांबावून गेले. मुख्याध्यापकांनी १०० नंबरवर फोन केला. भोसरी पोलीस तत्काळ शाळेत दाखल झाले. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बैठकीसाठी सोमवारी (दि. २१) बोलावण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)कासारवाडी शाळेतील २० विद्यार्थ्यांना काढून टाकण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्तांनी तसा आदेश दिला आहे. शिक्षक जीव मुठीत घेऊन मुलांना शिकवीत आहेत. काही विद्यार्थ्यांचा त्रास शाळेला होत असल्यामुळे याचा परिणाम इतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. - आशा उबाळे, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ
शाळेत फटाके फोडणाऱ्यांना पाठविले ‘घरी’
By admin | Published: December 17, 2015 2:14 AM