देशात गेल्या वर्षी पक्षी निरीक्षकांनी एकत्र येत चिमण्यांचे जीवनमान आणि त्यांची संख्या यावर अभ्यास केला. त्यांच्या अहवालात ग्रामीण भागात चिमण्यांचे प्रमाण वाढले, तरी शहरात कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदवले. एक प्रकारे हे खरे असून, शहराच्या अनेक भागांत नागरिकांना चिमण्या दिसत नाहीत. पण मध्यवर्ती भागातील मंडईमध्ये मात्र चिमण्यांचा चिवचिवाट सुरू असतो. येथील विक्रेते राजू आंबवले म्हणाले,‘‘चिमण्यांसोबतच आमची सकाळ सुरू होते. त्यांच्या आवाजाची सवय झाली आहे. त्यांच्याशिवाय आम्हाला करमत नाही. आम्ही त्यांना त्यांचे खाद्य, पाणी देतो. आमच्या भाजीच्या टोपलीत ते इकडून-तिकडे फिरत असतात. गिऱ्हाईक आले तरी त्या घाबरत नाहीत. त्या खूप माणसाळलेल्या आहेत.’’
----------
लॉकडाऊनमध्ये मंडई बंद होती. त्यामुळे चिमण्यांना इथे काहीच खायला मिळत नव्हते. म्हणून त्यांची संख्या कमी झाली. आता परत मंडई सुरू झाल्यावर त्यांचे प्रमाण मात्र कमी आहे. पूर्वी खूप चिमण्या असायच्या, आता तेवढ्या नाहीत. परत चिमण्यांनी मोठ्या प्रमाणावर चिवचिवाट करावी, हीच आमची इच्छा आहे.
- पल्लवी भांडवलकर, विक्रेत्या, महात्मा फुले मंडई
-----------------
मातीच्या भांड्यात ठेवा पाणी
उन्हाळा असल्याने नागरिकांनी गच्चीवर, खिडकीत, गॅलरीत मातीच्या भांड्यात पाणी ठेवले तर चिमण्यांसोबत इतर पक्षीदेखील तिथे येतील. चिमण्या या इतर पक्ष्यांपेक्षा अधिक धीट असतात. अनेक घरांमध्ये, खिडक्यांमध्ये त्या बिनधास्त वावरतात. पण अनेक परिसरात चिमण्या दिसत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करतात.
--------------