पुणे : दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूच्या संसर्गाची संपूर्ण जगाने धास्ती घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतानेही आफ्रिकेतून देशात आलेल्या नागरिकांवर लक्षकेंद्रित केले आहे. प्रत्येक राज्यात निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे अनेक राज्यातील महानगरांनी डिसेंबरमध्ये शाळा सुरु होण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. पुणे जिल्ह्यातही पहिली ती चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळा सुरू न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले होते. परंतु आजच पुन्हा नवा आदेश काढण्यात आला असून सोमवार ६ डिसेंबरपासून जिल्हयाच्या ग्रामीण भागातील १ ली ते ४ थी पर्यंतच्या शाळा सुरु होणार असल्याचे नमूद केले आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शाळा १ डिसेंबरपासून सुुरू होणार होत्या. मात्र, आफ्रिकेच्या नव्या विषाणूच्या संसर्गाचा वेग पाहता पुन्हा शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार सुरू होता. मात्र, विषाणूचा धोका ओळखून १ ली ते ४ च्या शाळा या सुरू न करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. आता ५ ते १२ पर्यंतच्या ज्या शाळा सुरू आहेत. त्याबरोबरच १ ली ते ४ थी पर्यंतच्या शाळाही सुरु होणार आहेत. त्यासंदर्भातही मार्गदर्शक सूचना काढण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळा सुरू करण्याच्या पूर्वतयारी आणि नियोजनासाठी शाळेत १०० टक्के उपस्थित राहावे असेही सांगण्यात आले आहे.
कोरोना नियमावलीचे पालन करण्याच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन समिती/शाळा समितीच्या बैठकांचे आयोजन करून पूर्वतयारी करावी. सर्व शिक्षकांचे लसीकरण १०० टक्के करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. कोरोनासंदर्भात सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या उद्देशाने शाळास्तरावर आवश्यक ते नियोजन करावे. यात शाळेचे निर्जंतुकीकरण करणे, शाळा परिसर स्वच्छ करणे तसेच शारीरिक अंतर राखण्याच्या दृष्टीने शाळांमध्ये बाकांची व बैठक व्यवस्था करावी. शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मास्क, सॅनिटायझर आदींची व्यवस्था करणे बंधनकारक राहणार आहे. आवश्यकतेनुसार स्थानिक, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शन व मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.