वडगाव मावळ (पुणे) : चारमजली इमारतीच्या छतावरून घसरून खाली पडलेल्या शालेय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडगाव मावळ येथे बुधवारी ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अभिनव जगदीश कडभने (वय १३, रा. संभाजीनगर, एमआयडीसी रोड, वडगाव), असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता सातवीमध्ये शिकत होता. जगदीश कडभने हे मूळचे बीड जिल्ह्यातील असून ते कामाच्या निमित्ताने वडगाव मावळ येथे आले आहेत. त्यांना दोन मुले आहेत. त्यातील थोरला मुलगा अभिनव याला पक्ष्यांबद्दल विशेष प्रेम होते. त्याच्या सोसायटीमध्ये दररोज एक चिमणी येत असे. चिमणी आली की अभिनव तिला पाहण्यासाठी बाहेर जायचा. बुधवारी सकाळी आवडत्या चिमणीचा खिडकीतून आवाज आला. चिमणी इमारतीच्या छतावर गेल्याचे पाहून अभिनव तिला दाणे टाकण्यासाठी छतावर गेला. छताच्या भिंतीवर बसून तो तिचे निरीक्षण करीत होता. तेवढ्यात शाळेला निघण्याची वेळ झाल्याने वडिलांनी त्याला हाक मारली. त्यामुळे तो निघत असताना शेवाळलेल्या भिंतीवरून तो घसरला आणि इमारतीच्या छतावरून खाली पडला. डोळ्यादेखत मुलगा खाली पडल्याचे वाहून वडिलांनी जोरात हंबरडा फोडला. त्यानंतर आईने फोडलेल्या टाहोने परिसरातील नागरिकांचे डोळे पाणावले. अभिनव रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
स्कूलबसच्या आधी रुग्णवाहिका आली...
अभिनवला रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यावेळी त्याला शाळेत घेऊन जाण्यासाठी स्कूलबस आली. पण रक्ताने माखलेल्या अभिनवला रुग्णवाहिकेतून नेले जात होते. हे दृश्य पाहून त्याचे शालेय मित्र आणि परिसरातील नागरिकांना शोक आवरणे कठीण झाले होते.