पुणे : शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्येशिक्षण घेणे शक्य नसल्याने या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शाळांशिवाय पर्याय नाही. परंतु, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षकच नसल्याने महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. सध्या पुणे शहरात महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची तब्बल १ हजार ५०१ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे.पुणे शहरातील महापालिकेच्या एकूण शाळा, विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी आदी बाबत सद्यस्थितीची माहिती नगरसेविका छाया मारणे यांनी प्रश्न-उत्तरामध्ये महापालिका प्रशासनाकडे मागितली होती. याबाबत दिलेल्या उत्तरामध्ये वरील माहिती समोर आली. महापालिकेच्या शाळांमध्ये शालेय शिक्षणाबरोबरच विद्यानिकेत, क्रीडा निकेतन, संगीत विद्यालय, आरोग्य शिक्षण, अध्ययन कौशल्य, ध्यानधारणा, योगासने, मॉडेल स्कूल आदी विविध प्रकल्प सुरू आहेत. परंतु, यासाठी आवश्यक असलेले शिक्षकच उपलब्ध नसल्याने अनेक उपक्रम केवळ कागदोपत्री असल्याचे स्पष्ट झाले आहे.शहरामध्ये महापालिकेच्या एकूण २७९ शाळाअसून, विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ९३ हजार १९७ ऐवढी आहे. खासगी शाळांमधील प्रचंड महागड्या शिक्षणामुळे शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना महापालिकेच्या शाळांशिवाय पर्याय नाही. परंतु शिक्षकांची कमतरता, पायाभूत सुविधांचा अभाव, अस्वच्छता यामुळे सध्या महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे.
पालिकेच्या शाळेत शिक्षकांची वानवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 3:53 AM