पुणे : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी आहे. विद्यार्थ्यांनो, तुमची पांढरा शर्ट, खाकी पँट आणि निळा स्कर्ट व पांढरा शर्ट या गणवेशातून मुक्तता होणार आहे. वर्षानुवर्षे तोच-तोच गणवेश घालून कंटाळलेल्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात रंगीबेरंगी गणवेश मिळणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव ठेवला असून, आज स्थायी समितीच्या बैठकीत त्याला मान्यता मिळाली.ग्रामीण भागात पूर्वी शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळा हे एकमेव माध्यम होते. आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रमाण वाढत असून, तेथील विद्यार्थी हे आकर्षक रंगसंगती असलेले गणवेश घालतात. मात्र, जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी पहिल्यापासून एकच गणवेश वापरत आहेत. आकर्षक रंगसंगतीचे गणवेश दिले, तर विद्यार्थ्यांचा उत्साह वाढून शाळेची आवड निर्माण होईल, याचा विचार करून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मुलांचा ड्रेस कोड बदलण्याचे ठरविले आहे, असे शिक्षण मंडळाचे सभापती व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नुुकत्याच झालेल्या शिक्षण मंडळाच्या बैठकीत गणवेश बदलण्याच्या प्रस्तावला मान्यता घेऊन आज हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर करण्याची मान्यता मिळण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला. शिवसेनेच्या आशाताई बुचके यांनी हा प्रस्ताव ठेवला. सर्व सदस्यांनी याला अनुमती दिली आहे. या सभेत प्रातिनिधिक स्वरूपात एक गणवेश सदस्यांना दाखविण्यात आला असून, तो सर्वांना मान्य असल्याचे वांजळे यांनी सांगितले. आता सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव ठेवला जाणार असून, त्या सभेची मान्यता मिळाल्यानंतर नवीन शैक्षणिक सत्रापासून हा गणवेश देण्याचा प्रयत्न असेल. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांचा आताचा गणवेश कुठेही उपलब्ध होत असल्याने तो मिळवणे सहज शक्य आहे. आता जो नवीन गणवेश देण्याचे ठरविण्यात येत आहे. नवीन गणवेशाला मान्यता मिळाल्यानंतर तो कसा व किती प्रमाणात उपलब्ध होईल, याची चाचपणी करून तो नवीन सत्रात देता येईल का नाही, हे ठरविण्यात येईल.- शुक्राचार्य वांजळे, शिक्षण मंडळ सभापती, जिल्हा परिषदआता आहे तो गणवेशही चांगला आहे; मात्र तोच-तोच घालून विद्यार्थी कंटाळले आहेत. त्यामुळे गणवेश बदलणे उत्तम आहे. इंग्रजी माध्यमाच्या मुलांप्रमाणे आम्ही टापटीप राहावे, असे त्यांना वाटते. सर्वच विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेने हा नवीन गणवेश द्यावा.- दत्तात्रय कंकशिक्षक, शिंद शाळा, भोर
जिल्हा परिषद शाळांचा गणवेश बदलणार
By admin | Published: April 15, 2015 11:11 PM