राहुल शिंदे - पुणे : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले असून राज्याच्या शिक्षण विभागाकडूनही त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, अनेक शाळांना दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न सोडविता आला नाही. परंतु, जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने विद्यार्थ्यांच्या पाठीवरून दप्तरच गायब केले आहे. शाळेच्या उपक्रमांची व शैक्षणिक प्रगतीची दखल घेऊन शाळेचा २०१९ चा अध्यक्षीय चषक देऊन गौरव करण्यात आला आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने १८८३ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या शाळेतून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत पोहोचले. आळेफाट्यापासून अवघ्या दीड किमी अंतरावर असणाºया शाळेत आजही परिसरातील खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करीत वडगाव आनंदची शाळा ज्ञानदानाचे मोठे काम करीत आहे. शााळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डी. बी. वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक सुनील टिळेकर आणि संगीता कुदळे, वृषाली कालेकर आणि मनीषा इले आदी शिक्षक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी महत्त्वाचे योगदान देत आहेत.मागील वर्षी मार्च महिन्यात शाळेतील शिक्षकांनी गावात घरोघरी जाऊन पालकांची भेट घेतली. तसेच मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठविण्याचे आवाहन केले. त्यावर इंग्रजी माध्यमात प्रवेश घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी वडगाव आनंदच्या शाळेत प्रवेश घेतला, असे टिळेकर यांनी सांगितले..........शंभर टक्के प्रगत शाळाशाळतील विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजीसह सर्व विषयांचे चांगले मार्गदर्शन मिळते. ही शाळा १०० टक्के प्रगत शाळेच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हे शक्य होत आहे............ शिक्षक व विद्यार्थ्यांचा ‘व्हॉट्स अप’ ग्रुप तयार करण्यात आला आहे. विद्यार्थी दिलेल्या गृहपाठ पूर्ण करून या ग्रुपवर त्याचा फोटो टाकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना तत्काळ गृहपाठ तपासून मिळतो. तसेच काही सुधारणा असल्यास त्याची माहिती शिक्षकांकडून दिली जाते...................दप्तरच झाले गायब शाळेत प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी पुस्तकाचा संच असून शाळेतही पुस्तकाचा जुना संच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दप्तर आणावे लागत नाही. विद्यार्थ्यांना साहित्य ठेवण्यासाठी कपाट उपलब्ध करून दिले आहे..............शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करीत असून खेळातून आनंददायी शिक्षण घेत आहेत. क्रीडा, संगीत, वक्तृत्व स्पर्धांमध्ये विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी दाखवत आहेत. विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांना माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचे अत्याधुनिक ज्ञान मिळत आहे.- संगीता कुदळे, शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा, वडगाव आनंद. .............खऱ्या अर्थाने २०१४ मध्ये शाळेचा कायापालट झाला. लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी शाळेत सर्व अत्याधुनिक सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढली असून संगणक, कला, क्रीडाक्षेत्रातही विद्यार्थी चांगली कामगिरी करीत आहेत. - सुनील टिळेकर, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, वडगाव आनंद.
दप्तराचे ओझे गायब करणारी ‘वडगाव आनंद’ची शाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 1:56 PM
वडगाव आनंद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने विद्यार्थ्यांच्या पाठीवरून दप्तरच गायब केले
ठळक मुद्देअध्यक्षीय चषकविजेती शाळा : परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांशी स्पर्धा करून शाळेने टिकविली गुणवत्ता मागील वर्षी मार्च महिन्यात शाळेतील शिक्षकांनी गावात घरोघरी जाऊन पालकांची घेतली भेट शिक्षक व विद्यार्थ्यांचा ‘व्हॉट्स अप’ ग्रुप तयार