पुणे : राज्य सरकारने एक डिसेंबरला पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ओमायक्रॉन विषाणूच्या सतर्क राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पण शिक्षण विभाग आणि राजेश टोपे यांनी शाळा सुरु होण्याच्या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अनेक जिल्ह्यात शाळा सुरु करण्याच्या तयारीलाही सुरुवात झाली होती. मात्र मुंबई महापलिककेने या विषाणूचा धोका पाहता शाळा १ तारखेपासून सुरु होणार नसल्याचे जाहीर केले. पुणे शहरातही आज महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे मनपा हद्दीतील पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी सांगितले आहे.
मोहोळ म्हणाले, ''ओमायक्रॉन विषाणूची धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी सारख्या शहरात तर लॉकडाऊन करण्यात आला आहे. पुणे शहरात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असले तरी लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. पंधरा डिसेंबरनंतर पालक संघटना, प्राचार्य - शिक्षक आणि टास्क फोर्स यांच्याशी चर्चा करून पुशिलं निर्णय घेण्यात येईल असंही ते यावेळी म्हणाले आहेत.''