पुणे : पुण्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. एका दिवसात १०० च्या आत असणारी रुग्णसंख्या आज थेट हजारांवर येऊन पोहोचली आहे. कालच महापौर मुरलीधर मोहोळ यांनी निर्बंध वाढवण्याबाबत अजिबात पवारांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पुणे शहरातील १ ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. नववी ते दहावीचे वर्ग सुरू राहतील, कारण या वयोगटातील मुलांना लसीकरण सुरु झाल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
महापालिकेने वाढवली चाचण्यांची संख्या
ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. ओमायक्रॉनचा संसर्गाचा वेग जास्त आहे. परंतु, लक्षणेविरहित असल्याने काेणत्याही प्रकारे अनावश्यक भीती न बाळगता रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
राज्यात ५१० ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद
पुणे शहरात काल ३६, पिंपरी चिंचवडमध्ये ८ तर पुणे ग्रामीणमध्ये २ रुग्णांची नोंद झाली आहे. आजवर राज्यात ५१० ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी पुणे शहरात ४९, पिंपरी चिंचवडमध्ये ३६ आणि पुणे ग्रामीणमध्ये २३ रुग्ण आढळून आले आहेत. ५१० पैकी यापैकी १९३ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.