पुणे : राज्य शासनाने पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आता पालिकेनेही शहरातील शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून या शाळा सुरू होणार आहेत. याबाबतचा आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला.
शाळा सुरू करण्याआधी शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. यासोबतच थर्मामीटर, थर्मल गन, ऑक्सिमिटर, जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंबाबत शाळा प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कुलबस, स्कुल व्हन आदी वाहनांचे निर्जंतुकीकरण नियमित होण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करणे आवश्यक राहणार आहे.
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असून चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाने परिमंडळ
वैद्यकीय अधिकारी व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांना सादर करणे आवश्यक केले आहे. वर्गखोल्या तसेच स्टाफरूम मधील बैठक व्यवस्था सुरक्षित अंतराच्या नियमानुसार असावी. तसेच वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी लागणार आहे. शाळेत दर्शनी भागावर सुरक्षित अंतर, मास्कच्या वापरासंदर्भात मार्गदर्शक सूचना असणारे फलक लावणे आवश्यक असून शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहताना मुलांमध्ये किमान ६ फूट अंतर राखावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी सहमती आवश्यक असून ही सहमती शिक्षण पर्यवेक्षक प्राथमिक शिक्षण विभाग यांना सादर करावी लागणार आहे. शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ करणे व स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून किमान दोन वेळा (विद्यार्थी वाहनात बसण्याअगोदर व उतरल्यानंतर) निर्जंतुकीकरण करण्यात यावे. वर्ग कोणत्याही परिस्थितीत बंद खोल्यांमध्ये भरवण्यात येऊ नये. हवा खेळती राहण्यासाठी वर्ग खोल्यांची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २३ जानेवारपासून शाळेत उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.