पुणे : कोरोनाच्या संसर्गामुळे १६ मार्चपासून बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नव्या वर्षात ४ जानेवारीपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास पुणे महापालिकेने मान्यता दिली आहे़
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहे़ या आदेशात विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी घेणे व ती शिक्षण पर्यवेक्षक माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडे सादर करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट केले आहे़
कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव शहरात कमी झाल्याने, जूनपासून ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत टप्प्याटप्प्याने काही क्षेत्रे खुली करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली़ यानुसार पुणे महापालिकेनेही २३ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ दिसू लागल्याने ३ जानेवारीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता.
या शैक्षणिक वर्षातील दहावी व बारावीच्या परीक्षा अवघ्या तीन महिन्यांवर आल्याने महापालिकेने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश देतानाच कोरोना प्रतिबंधासाठी शाळेमध्ये नित्याने निर्जंतुकीकरण करणे, थर्मामिटर, पल्स ऑक्सिमिटर, हात धुण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. एका वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी असे सूचित करण्यात आले आहे़ शाळा उघडण्यापूर्वी या सर्व बाबींची पूर्तता झाल्याची खात्री माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी करुन तसा अहवाल सादर करावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे़
चौकट
शिक्षक-कर्मचारी दि. २८ पासून शाळेत
शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी शाळा प्रशासनाने त्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २८ डिसेंबरपासून शाळेत उपस्थित राहण्यास सांगितले आहे़ पुणे महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने सोमवारी (दि. २८) महापालिकेच्या शाळा मुख्याध्यापकांची बैठक बोलावली असल्याचे महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी सांगितले.