लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि क्लास १४ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिले.
साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील काही काळ निर्बंध आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक सेवा यांना या निर्णयातून यापूर्वी दिलेली सवलत कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने शाळा, महाविद्यालये, सर्व खाजगी क्लासेस व इतर शाळा १ मार्च ते १४ मार्चपर्यंत बंद ठेवणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने २८ फेब्रुवारीपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालये, सर्व खाजगी क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत. परंतु, पुणे जिल्हयात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालये, सर्व खाजगी क्लासेस व इतर शाळा १४ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात येत आहेत, मात्र ऑनलाईन पध्दतीने शाळा, महाविद्यालये, सर्व खाजगी क्लासेस व इतर शाळा सुरु राहतील , तसेच पुणे जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. नियोजित परीक्षा आवश्यक असल्यास कोरोना विषाणूच्या उपाययोजनांचे पालन करुन घेण्यात याव्यात. शक्यतो ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात याव्यात, असेही आदेशात म्हटले आहे.
सदर आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग कायदा १८९७ आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व कायद्यातील इतर नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेश स्पष्ट केले.