पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांनी विद्यार्थ्यांना किती तास ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करावे; याबाबत शालेय शिक्षण विभागाने मागील वर्षी अध्यादेशाद्वारे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. मात्र, या आदेशाचे अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. परंतु, शाळांकडून घेतल्या जात असलेल्या अधिकच्या तासांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोरोनामुळे सुमारे दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेणे शक्य नसल्यामुळे सध्या विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने वर्गांना उपस्थिती लावत आहेत. शासनाने कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांना दिवसभरात किती तास ऑनलाइन पद्धतीने शिकवावे, याबाबत मागील वर्षी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा कंटाळा आला आहे. त्यातच काही शाळांकडून सुमारे चार ते पाच तास विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले जात असल्याच्या तक्रारी पालक करत आहेत.
शासन आदेशानुसार पूर्वप्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना सोमवार ते शुक्रवार प्रत्येक दिवशी केवळ तीस मिनिटांपर्यंत ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. तसेच पहिली ते दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी ३० मिनिटांची दोन सत्रे एवढाच कालावधी ऑनलाइन पद्धतीने शिकवावे. त्यातील पंधरा मिनिटे पालकांची संवाद साधावा तर, पंधरा मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण द्यावे.
इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी ४५ मिनिटे दोन सत्रे घ्यावीत. तसेच नववी ते बारावीची प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांची चार सत्रे घ्यावी, असे शासन आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, शासनाने दिलेल्या या मार्गदर्शक सूचनांचे अनेक शाळांकडून पालन होताना दिसत नाही.