लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाच्या आदेशानुसार पुणे जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी शाळा मधील इयत्ता 9 ते 12 पर्यंतचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करुण्यासाठी आवश्यक तयारी करण्याच्या सुचना सर्व यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार 23 नोव्हेंबरला शाळा सुरू होतील, पण शिक्षकांची कोरोना चाचणी पूर्ण होतील तशा टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
देशमुख यांनी काढलेल्या आदेशात पुणे जिल्हयातील इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वीचे सर्व शासकीय व खाजगी शाळांचे वर्ग, वसतीगृह, आश्रमशाळा विशेषत: आरतराष्ट्रीय विद्यार्थ्यांची, विद्यार्थ्यांचे वसतीगृह सुरु करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
यात शाळा सुरु करण्यापूर्वी आरोग्य,स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना, शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व संबंधित शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन पालकांची लेखी संमत्ती घेऊनच, प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याचे नियोजन करावे. शाळेत स्वच्छता व निर्जतुकीकरण विषय सुविधा सुनिश्चित करणे, शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे, थर्मल गन, ऑक्सी मिटर, जंतूनाशक,साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.