पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहर व परिसरात काेसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे साेमवारी तसेच मंगळवारी पुण्यातील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या हाेत्या. मंगळवारी पावसाचा जाेर ओसरल्यामुळे तसेच पुणे शहरात अतिवृष्टीचा इशारा नसल्याने बुधवारी शहरातील शाळा नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. दरम्यान जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भाेर, वेल्हा या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी हाेत असल्यामुळे या तालुक्यातील शाळा, महाविद्यालये बुधवारी बंद राहणार आहेत.
महिन्याभरापासून पुणे शहर व जिल्ह्यात जाेरदार पाऊस हाेत आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही सर्व धरणं शंभर टक्के भरली आहेत. त्याचबराेबर पवना तसेच भाेर भाटघर धरण देखील शंभर टक्के भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पुण्यातील मुळा- मुठा तसेच पवना या नद्यांना पूर आला आहे. रविवारी तसेच साेमवारी पुण्यात मुसळधार पाऊस झाल्याने नदी किनारच्या भागात पूराचे पाणी शिरले. शहरातील सिंहगड रस्ता, बाणेर, हिंजवडी, औंध, विश्रांतवाडी, पाटील इस्टेट झाेपडपट्टी, ताडीवाला राेड, जुना बाजार येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे शेकडाे नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. या पावसामुळे पुण्यातील शाळांना साेमवारी व मंगळवारी सुटी जाहीर करण्यात आली हाेती.
दरम्यान आज पावसाचा जाेर ओसरला असून खडकावसला धरणातून मुठा नदीपात्रात करण्यात येणारा विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी पुणे शहरातील शाळा तसेच महाविद्यालये सुरु राहणार आहेत. जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भाेर, वेल्हा या तालुक्यांमध्ये अद्याप पावसाचा जाेर असल्याने तसेच त्या भागात अतिवृष्टीची शक्यता असल्याने बुधवारी या तालुक्यातील शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत.