पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कलाशिक्षण (संगीत, नृत्य, नाटक, पाककला) बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच करण्यात येणार आहे. शाळांनी दर आठवडयाला किमान दोन तास कला शिक्षणासाठी द्यावेत असे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळांमधील शिक्षण आनंददायी व्हावे म्हणून सीबीएसईकडून काही बदल करण्यात येत आहेत. शाळांचे मुख्याध्यापक, राष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि कला क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून हे बदल करण्यात येत आहेत. कला विषयांची कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाही, मात्र विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील एकूण अध्ययनाचे मूल्यमापन केले जाणार आहे.
कला शिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांकडून काही प्रयोग, प्रकल्प करून घेतले जाणार आहेत तसेच कलांची मुलभूत ओळख करून दिली जाईल असे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कला शिक्षणामध्ये त्यांना काहीतरी शिकवण्यापेक्षा विद्याार्थ्यांना त्यातून आनंद मिळावा अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हे शिक्षण समावेशक, संवादी आणि प्रयोगशील अशी अपेक्षा सीबीएसईने काढलेल्या परिपत्रकामध्ये व्यक्त केली आहे.कला शिक्षणामध्ये सीबीएसईने चार प्रकारांना प्राधान्य दिले आहे. त्यात संगीत, नृत्य, दृश्यकला आणि नाटक यांचा समावेश आहे. तर सहावी ते आठवीच्या विद्याार्थ्यांना पाककला हा विषय शिकविण्यात येणार आहे. पाककलेच्या विषयामध्ये पौष्टिक खाद्य, भारतातील पिके, वेगवेगळ्या प्रकारची धान्य, भाज्या, तेल कसे तयार होते, शेतीची योग्य पद्धत आदींचीही माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर विविध राज्यांतील वैविध्यपूर्ण खाद्यासंस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.