पुणे : शाळांनी विद्यार्थ्यांकडून केवळ शैक्षणिक शुल्क (ट्युशन फी) घ्यावे. एकाही विद्यार्थ्याचे ऑनलाइन शिक्षण बंद करू नये, अशी सूचना शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे. संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांचे बंद केलेले ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करून त्यासंदर्भातील अहवाल तत्काळ सादर करावा, असेही आदेश त्यांनी दिले आहेत.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. शाळांकडून नियमित दिल्या जाणाऱ्या इतर सोयी-सुविधांचा लाभ विद्यार्थी घेत नाहीत. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांकडून केवळ ट्युशन फी आकारणे अपेक्षित आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाळांना एकाही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करता येत नाही, तरीही पुणे शहर व परिसरातील अनेक शाळांनी शुल्क भरले नाही म्हणून अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून दूर ठेवले आहे.
यासंदर्भात, उपसंचालकांनी आदेश काढूनही निर्णय घेतला जात नसल्याने गुरुवारी एमआयएम आणि संभाजी ब्रिगेडने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले. शहरातील काही शाळांच्या पालकांनीसुद्धा आंदोलनात सहभाग घेतला. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फय्याज इलाही शेख यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून दूर ठेवता येत नाही. यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास अनेक पालकांना दिलासा मिळेल.