पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांना कार्यालयीन वापरासाठी दोन संगणक संच देण्यास सुरुवात झाली. शिक्षण मंडळ सभापती चेतन घुले यांच्या हस्ते गुरुवारी चिखली, म्हेत्रेवस्ती येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयाला दोन संगणक संच दिले. या संगणकांच्या माध्यमातून शिक्षण मंडळ आणि महापालिका शाळांचा प्रशासकीय कारभार आॅनलाइन करण्यात येणार आहे.महापालिकेच्या १३१ प्राथमिक आणि १८ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशासकीय कामकाजासाठी महापालिका मुख्यालयातील शिक्षण मंडळ कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो. त्यातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडेही दुर्लक्ष होते. परिणामी, शैक्षणिक दर्जावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांना जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देता यावा, यासाठी मंडळाने प्रशासकीय कामकाज आॅनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत सर्व महापालिका शाळांना दोन संगणक संच देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थी संख्या जादा असलेल्या मोठ्या शाळांना तीन संगणक संच दिले जाणार आहेत. चिखली, म्हेत्रेवस्ती येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेला घुले यांच्या हस्ते संगणक संच दिले.माजी सभापती धनंजय भालेकर, सविता खुळे, विष्णुपंत नेवाळे, पर्यवेक्षिका प्रभावती पाटील, नीता उबाळे, राजश्री कैचे, वर्षा पवार, मनीषा भोसले, प्रदीप घुटे, संतोष जंगम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)> मुख्याध्यापक व शिक्षकांचा कार्यालयीन कामकाजासाठी जाणारा नाहक वेळ वाचावा, यासाठी शाळेला संगणक संच देण्यात येत आहे. शाळेला इंटरनेट सुविधाही पुरविली जाणार आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेतूनच शिक्षण मंडळ कार्यालयाशी पत्रव्यवहार करता येईल. तसेच विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती तयार करता येईल.- चेतन घुले, सभापती
शाळांचा कारभार होणार आॅनलाइन
By admin | Published: December 11, 2015 12:44 AM