लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच उच्च विद्याविभूषित शास्त्रज्ञ आहेत. भारत केवळ सुपर पॉवरच नाही, तर आर्थिक सुपर पॉवर बनू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत बनवण्याचे स्वप्न आहे. संरक्षण संस्था व आधुनिक तंत्रज्ञान (डीआयएटी) संस्थेतील शास्त्रज्ञांकडे पाहून ते नक्की पूर्ण होईल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.
पुण्यातील खडकवासला येथील डीआयएटी संस्थेतील कार्यक्रमात ते बोलत होते. डिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपपेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)चे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी, डीआयएटीचे कुलपती डॉ. सी.पी. रामनारायण आदी या वेळी उपस्थित होते.राजनाथसिंह म्हणाले, भारताने उत्पादित केलेल्या लसीचा आज अनेक देशांना फायदा होत आहे. देशात शोध आणि संशोधनाचे वातावरण तयार झाले आहे. संशोधनात भारत पुढे जात आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन एनर्जी आणि बायो सायन्स या विषयांत खूप काही करण्याची आवश्यकता आहे.
या वेळी डीआयएटीतील डॉ. पवनकुमार खन्ना, डॉ. भास्कर मुजुमदार व आणखी एक अशा तीन शास्त्रज्ञांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला. २ टक्के ब्रॅॅकेटमध्ये त्यांचा समावेश हा आपल्यासाठी गौरवाचा क्षण आहे,” असे गौरवोद्गार राजनाथसिंह यांनी काढले.
राजमाता जिजाऊंनी बालशिवाजींना शिकवले डावपेच राजमाता जिजाऊ, समर्थ रामदास आणि दादाेजी कोंडदेव यांनी खेळाच्या माध्यमातून बालशिवाजींना डावपेच शिकवले आणि पुढे ते छत्रपती शिवाजी महाराज बनून राष्ट्रनायक बनले, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात केले. राणी लक्ष्मीबाई, राणी चेलम्मा, दुर्गावती यांच्या जीवनातही खेळांना महत्त्व होते. हीच परंपरा आता भारतीय लष्कर पुढे नेत आहे, असेही ते म्हणाले.