नारायणगाव : कुकडी नदी कॅनॉलवरील शेतकऱ्यांच्या मोटारची केबल आणि शेतातील ड्रिप पाईप चोरी करणाऱ्या चोरट्यासह भंगार व्यावसायिकाला नारायणगाव पोलिसांनी अटक केली असून या दोन्ही आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली .
कैलास पोपट काळे (वय ४२) (रा. कोल्हेमळा, नारायणगाव) आणि भंगार व्यावसायिक रफिक बैदुला शेख (रा. नारायणगाव) यास अटक केली आहे. चोरीची फिर्याद अंकुश मधुकर औटी यांनी दिली आहे.
अंकुश औटी यांचे औटीमळा, नारायणगाव येथे उसाचे शेतातून १६ एमएम मापाच्या काळ्या रंगाचे जयहिंद कंपनीचे ठिबक सिंचनाची ड्रिपचे एकूण ४ बंडल तसेच १०० फुट मापाची पाॅलीकॅप कंपनीची ४ एमएम जाडीची इलेक्ट्राॅनिक केबल चोरीस गेला होता. सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लोंढे, कॉन्स्टेबल लोहोटे, वाघमारे, अरगडे यांनी तपास केला असता त्यांना एका बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कैलास काळे याने ड्रिप व केबलची चोरी केली आहे. पोलीस पथकाने काळे याचा शोध घेऊन ताब्यात घेतले असता त्याचे जवळ केबल कट करण्याचे साहित्यासह कटर, एक्साॅपान हे मिळून आले . दोन्ही आरोपींना अटक करून जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सहा. फौजदार के. डी . ढमाले हे करीत आहे.
मोटारची केबल आणि शेतातील ड्रिप पाईप चोरी प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व पोलीस पथक आणि अटक केलेले दोन आरोपी.