वाकड/पिंपरी : सकाळी लवकर उठून पाठीवर पोते घेत भंगार गोळा करण्याचे नाटक करता करता बंद घरांवर नजर... दुपारी मोलकरीण बनून त्याच घराच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे जात कामाची चौकशी... इमारतीखाली खेळणाऱ्या लहान मुलांजवळ बंद घरातल्यांची नातेवाईक म्हणून माहिती घेणे आणि रात्री खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिणे, रोकड लंपास करणे, असे घरफोडीचे अजब तंत्र वापरून गेली पाच वर्षे पिंपरी चिंचवडसह मुंबई पोलीसांना भंडावून सोडणारी महिला बुधवारी सापडली. लक्ष्मी संतोष अवघडे (वय २४, रा. जाधववाडी, चिखली, पिंपरी-चिंचवड, मूळ गाव पाटण, जि. सातारा) असे तिचे नाव आहे. ती दोन मुलांची आई आहे. तिच्याकडून तब्बल ६५ तोळे दागिणे हस्तगत केले आहेत. ती जाधववाडी, चिखलीत भाड्याच्या खोलीत एकटीच राहत होती. कोणाला शंका येऊनये म्हणून चोरीचे साहित्य तिने सातारा जिल्ह्यातील पाटण या मूळ गावी लपवून ठेवले होते. हा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तिच्याकडून ६५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. बाणेर रस्त्यावर घरफोडी करताना तिची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या फुटेजच्या साहाय्याने शोध घेतल्यानंतर लक्ष्मीचा छडा लागला. तपासादरम्यान सहायक निरीक्षक महेश सागडे यांना पाटील यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये ही महिला आढळली. तिची माहिती घेतली असता खबऱ्यामार्फत ती चिखलीतील जाधववाडी येथे भाड्याच्या खोलीत एकटीच राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तेव्हा तिने वरील गुन्हे कबूल करीत दागिने पाटण गावातील घरी ठेवल्याचे सांगितले. तेथील घराच्या पोटमाळ्यावरून हे दागिने ताब्यात घेतले. घरफोडी, चोरी, दरोडे असे गुन्हे घडले की पोलीस सराईत गुन्हेगारांकडे चौकशी करत. तसेच अशी घरफोडीची पद्धत असणाऱ्यांना उचलून आणत. परंतू यामधून काही निष्पन्न होत नव्हते. याचमुळे पोलीस चक्रावून गेले होते. तसेच एकाही शेजाऱ्यापाजाऱ्याकडून या संशयीत महिलेविषयी कोणी सांगितले नव्हते. इतक्या बेमालूमपणे ही महिला चोऱ्या करायची. त्यामुळे पोलीसांना यश येत नव्हते.वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. जे. शेख, सहायक निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सागडे, पोलीस नाईक हनुमंत राजगे, दत्तात्रय फुलसुंदर, महादेव जावळे, किशोर पाटील,राजू केदारी, हवालदार महादेव धनगर,नागनाथ लकडे,रवींद्र तिटकारे, नीता जाधव,जकीया बागवान यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. (प्रतिनिधी)
भंगार वेचता वेचता करायची घरफोडी
By admin | Published: November 20, 2014 4:29 AM