धायरीमधील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बिर्याणी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांबरोबर झालेल्या वादातून कोयत्याने वार करून हॉटेल व्यावसायिकासह दोघांच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना धायरीतील गणेशनगरमधील बिर्याणी हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी मयूर मते (वय ३३, रा. धायरी) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांचा हॉटेल व्यवसाय आहे. त्यांच्या गारवा बिर्याणी हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी दोघे जण बिर्याणी घेण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबर फिर्यादी यांची शाब्दिक व किरकोळ बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरून दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्या दोघांनी व त्यांच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये घुसून त्यांच्यावर कोयत्यासारख्या धारधार हत्याराने त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने वार केला. तेव्हा फिर्यादी यांच्या शेजारी उभा असलेल्या कामगार इसराफिल हामध्ये आल्याने तो वार त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसून तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा वार केल्यावर फिर्यादी यांनी खुर्चीच्या सहाय्याने त्याचा वार अडविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीवर वार होऊन त्यात ते गंभीर जखमी झाले. दोघांच्या साथीदारांनी हॉटेलमधील बिर्याणीची पातेले, झाकणे, खुर्चा व ट्रे इत्यादी साहित्य फिर्यादी व हॉटेलमधील कामगार अश्फाक, इसराफील व इतर कामगारांवर फेकून मारुन जखमी केले. हा प्रकार पाहून हॉटेल समोर लोकांची गर्दी जखमी होती. तेव्हा या टोळक्याने जमलेल्या लोकांना व आजूबाजूच्या दुकानदारांना शिवीगाळ करीत दमदाटी करून दहशत निर्माण केली. सिंहगड रोड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक दीपक खेडकर तपास करीत आहेत.