बारामती : मळद-जांभळी फाटा (ता. बारामती) येथे स्वस्त धान्य दुकानाचा माल घेऊन थांबलेल्या संशयास्पद ट्रकवर तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी कारवाई केली. या ट्रकमधून १२८ पोती गहू, ८४ पोती तांदूळ, २ पोती साखर असा माल जप्त करण्यात आला. हा माल बारामती शहरातील म्हाडा कॉलनीतील स्वस्त धान्य दुकानातील असल्याने या दुकानालाही सील करण्यात आले आहे. हे दुकान बिस्मिल्ला महिला बचत गटामार्फत चालवण्यात येते. या दुकानाचा कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याची शिफारस तहसीलदारांनी केली आहे. हे धान्य १२ मार्च रोजी माळेगाव येथील सरकारी धान्य गोदामातून उचलल्याचे सांगण्यात आले. गोदामातून धान्य वितरित करण्यात आलेल्या परवान्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर रात्री दुकान सील करण्यात आले. स्वस्त धान्य दुकानदाराने उशिरा गोदामातून माल उचलला. हमाल न मिळाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने मेखळी जांभळी फाटा येथे माल भरलेला ट्रक भावाच्या घराशेजारी थांबवण्यात आल्याचे दुकानदार शाहिन तांबोळी यांचा मुलगा शाहबाज तांबोळी यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशच्या प्रती दर्शनीभागात लावलेल्या नाहीत, तक्रार सूचना पुस्तिकेमध्ये पेजेस केलेले नाहीत. तक्रार पुस्तक येथे उपलब्ध आहे असा फलक दर्शनीभागावर नाही. स्वस्त धान्य दुकानातील धान्य विनापरवाना इतर ठिकाणी वाहनासह उभे करणे ही गंभीर बाब आहे. आधार सिडिंगचे काम संथ आहे. आदी त्रुटी आढळल्या आहेत. (प्रतिनिधी)दुकानाची तपासणी केल्यानंतर गहू ७.५० क्विंटल, तांदूळ ९.५४ क्विंटल आढळून आले. दुकानातील ‘स्टॉक रजिस्टर’वर २५ जानेवारी २०१६ पर्यंत गव्हाचे तर २० फेब्रुवारी २०१६ पर्यंतच्या नोंदी अढळल्या.पावत्या २७ फेबु्रवारी २०१६ पर्यंतच्या आढळल्या. पावतीपुस्तके, धान्यसाठा रजिस्टर अद्ययावत नसल्याने शिल्लक धान्य, पुस्तकी शिल्लक याचा मेळ घेता आला नाही. ही बाब गंभीर आहे. पावती पुस्तकावर काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या सह्या नाहीत, साठा फलक नाही, दर फलक लावलेला नाही, स्वस्त धान्य दुकानात इतर माल ठेवलेला आहे. त्यामुळे धान्याची पोती व इतर मालाची पोती ओळखता येत नाहीत.
बारामतीत महिला बचत गटाच्या रेशन दुकानाला सील
By admin | Published: March 15, 2016 3:58 AM