पुणे : बांगलादेशी आणि पाकिस्तानी हटाव या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम सुरु केली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील धनकवडी परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही मोहीम हाती घेत तीन जणांना ताब्यात घेतले होते. मात्र ते तीनही जण भारतीय निघाले असून, पुणे पोलिसांनी तिघांनाही सोडून दिलं आहे.
शहरातील धनकवडी भागात शनिवारी बांगलादेशी लोकांना शोधण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी मोहीम राबवली, यावेळी पोलीसही उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी यावेळी काहींना कागदपत्रांची विचारणा केली. तर त्यातील तीन संशयित बांगलादेशी घुसरखोरांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. पण ते आता भारतीय असल्याचं समोर आले असून, पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर सोडून दिले आहे. त्यामुळे मनसेच्या 'बांगलादेशी मोहिमेचा' फज्जा उडाला असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी ठाणे, बोरिवली भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याची मोहीम केली होती. ठाण्यातील किंगकाँगनगर येथे राहणाऱ्या तीन बांगलादेशी कुटुंबाना पकडून मनसेने पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यांनतर शनिवारी पुण्यात सुद्धा अशीच मोहीम राबवण्यात आली होती. मात्र ताब्यात घेतलेली लोकं भारतीयचं असल्याचे समोर आले.