पुणे : जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील घाट परिसर असलेल्या तालुक्यांमध्ये माळीण दुर्घटनेची पुनरावृृत्ती घडू नये यासाठी प्रशासनाकडून उपाययाेजना सुरू आहे. दरड कोसळणे, घरांची पडझड, आदी घटना टाळण्यासाठी गावांतील धोकादायक इमारती, घरांचा शोध घेऊन तेथील नागरिकांना सुरक्षेच्या ठिकाणी स्थलांतरित करावे, असे आदेश जिल्ह्यातील १३०० हून अधिक ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. यात विशेष करून जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
विशेषत: घाट परिसरातील तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी अतिवृष्टीही होत आहे. परिणामी काही भागांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अनेक भागांतील रस्ते बंद झाले आहेत. रस्त्यांतील हे अडथळे दूर करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाबाबतची बैठक घेऊन धोकादायक इमारती, घरे यांबाबत सर्वेक्षण करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील धोकादायक इमारती, पडण्याची शक्यता असलेल्या घरांचा शोध घेण्याच्या सूचना तेराशेहून अधिक ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.
येथे घेतली जातेय विशेष खबरदारी
विशेषतः जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने पावसामुळे पडझड, दरड कोसळण्याच्या घटना अधिक घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने या तालुक्यांतील गावांवर लक्ष केंद्रित केले आहे. याबाबत ग्रामसेवक, तलाठी व ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनाबाबत झालेल्या बैठकीत खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरड काेसळणे किंवा घराची पडझड हाेण्याचा धाेका असलेल्या कुटुंबाचे स्थलांतर करण्यासाठी जिल्हा परिषदेला निधी मिळणार आहे. धोकादायक इमारती, घरे यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद