लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिकारीच्या शोधात ‘ती’ आकाशात घिरट्या घालत होती. दमून एका झाडावर विसावली व पतंगाच्या मांज्यात अडकली. सहा तासांच्या प्रयत्नांनंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांना मंगळवारी (दि. १९) दुपारी तिची सुटका करण्यात यश आले.
घोरपडी पेठेतील कबरस्तानात बरीच झाडी आहे. त्या परिसरात एक घार आकाशात घिरट्या घालत होती. दमल्याने ती तिथल्याच एका झाडावर विसावली. झाडावरच्या पतंगाच्या मांज्यात तिचे पाय अडकले. त्यानंतर, पंखांनाही मांज्याचा विळखा बसला. सुटका होणे अशक्य झाले.
नेमके त्याच वेळी ओंकार मोरे व मेहबूब अलाना या सामाजिक कार्यकर्त्यांची नजर तिच्यावर पडली. काही मित्रांना बोलावून त्यांनी मग एका काठीच्या साह्याने तिला सोडविण्याचा प्रयत्न सुरू केला. सलग सहा तासांच्या धडपडीनंतर त्यांना त्यात यश मिळाले. घार थोडी जखमी झाली होती. काही पक्षीमित्रांना विचारून त्यांनी तिच्यावर उपचार केले व त्यानंतर तिला राजीव गांधी उद्यानात दाखल केले. ‘बर्ड फ्लू’ची भीती असतानाही निसर्ग व पक्षीप्रेमातून हे काम केल्याचे मोरे व अलाना यांनी सांगितले.