सासवड : सासवड शहरातून जाणाऱ्या सासवड-कापूरहोळ रस्त्यावरील सासवड तहसीलदार कार्यालयाच्या कोपऱ्यावर असलेला वळणरस्ता सरळ करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे; तसेच न्यायालयाच्या बाजूस रस्त्याच्या कडेला या रस्त्यावरील गावे आणि त्या गावांचे किलोमीटरमधील अंतराचा सूचनाफलक लावलेला असून या फलकावरती ‘बालाजी मंदिरऐवजी बालाजीनगर’ असा गावाचा उल्लेख केलेला आहे. ज्या रस्त्यावर ती सूचना फलक किंवा दिशादर्शक फलक सार्वजनिक बांधकाम विभाग लावत आहे, त्या रस्त्यावरील गावे ही माहिती नसावी, अशी अवस्था सध्या फलकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पुरंदर सार्वजनिक बांधकाम विभागाची झालेली दिसते.सदर चुकीच्या दिशादर्शक व सूचनाफलकाच्या ठिकाणी चारही बाजूने रस्ते एकत्र येत असल्याकारणाने छोटा चौक बनलेला आहे.सदरचे क्षेत्र हे अपघातप्रवण क्षेत्र झालेले आहे. अनेक छोटे-मोठे अपघात या ठिकाणी वारंवार झालेले आहेत. न्यायालयीन; तसेच महसुली कामकाजासाठी पुरंदर तालुक्यातील आजूबाजूच्या गावांमधील नागरिक रोज न्यायालयाच्या आवारात वाहने घेऊन येत असतात. या आवारात वाहनांची वर्दळ कायमच असते तसेच गुरुवारी नारायणपूर देवस्थान, केतकावळे बालाजी मंदिर, पुरंदर किल्ला या ठिकाणी जाणारे पर्यटक व भाविकांची गर्दी असते त्यामुळे सदर चौकात गतिरोधकाची नितांत गरज आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी हा चुकीचा सूचनाफलक काढून त्या ठिकाणी योग्य दिशादर्शक व सूचना फलक त्वरित लावावे व गतिरोधक यांची सोय करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पुरंदर तालुक्यातील नवीन गावाचा शोध?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 3:02 AM