विशाल शिर्के
पिंपरी : म्युकरमायकोसिस आजारावरील लस मिळविण्यासाठी नाशिक, उस्मानाबाद आणि विविध ठिकाणांहून पुण्यात लस शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. काळ्या बाजारातून मिळाली तरी चालेल, असे मेसेजही नातेवाइकांना पाठविण्यात येत आहेत. त्यानंतरही हाती निराशा येत असल्याचे चित्र आहे.
कोरोनाबाधितांना म्युकरमायकोसिसची बाधा होत आहे. या फंगसची बाधा झाल्याने काहींना प्राण गमवावे लागले आहेत. जबडा, डोळे अशा अवयवांना गंभीर दुखापत झाल्याची उदाहरणेही समोर येत आहेत. एका रुग्णाला किमान पन्नास ते शंभर या दरम्यान लसींची आवश्यकता भासत आहे. बाजारात लस उपलब्ध नसल्याने रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. काहींना दररोज चार ते पाच लसींची आवश्यकता आहे. त्यांना एक लस मिळविण्यासाठी स्वतःचे शहराच नव्हे तर पुण्यासारख्या शहरातदेखील शोध घ्यावा लागत आहे. अगदी काळ्या बाजारातून लस मिळाली तरी चालेल, मात्र ती उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी, असे मेसेज पुण्यातील आप्तांना पाठविण्यात येत आहेत.
—-
कोरोनाकाळात रुग्णांच्या मदतीसाठी व्हाॅट्सॲप ग्रुप तयार केला आहे. त्यावर नाशिक, उस्मानाबाद आणि पुण्यातून म्युकरमायकोसिसवरील लस देण्याची मागणी केली जात आहे. पुण्यातच लस उपलब्ध होत नाही. या फंगसची बाधा फारशी होत नसल्याने उत्पादन कमी होत असल्याचे औषध विक्रेते सांगत आहेत. सरकारने माफक दरात आणि पुरेसा साठा रुग्णालयांना उपलब्ध करून द्यावा.
- संदीप दारवटकर, सामाजिक कार्यकर्ते
—-
माझ्या मित्राला म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे. जवळपास सत्तर ते शंभर लसींची आवश्यकता भासेल. या लसींची घाऊक किंमत ३ हजार आठशे असून, ते साडेसात हजार रुपयांना मिळत आहे. इतका खर्च परवडणारा नाही. त्यावर राज्य सरकारने नियंत्रण आणायला हवे.
- मनोज लुंकड, नाशिक, निफाड
—-
माझ्या पतीला म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. एकूण सत्तर लसींची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. त्यातील ३४ लसी विविध ठिकाणांहून उपलब्ध केल्या. पुण्यातील नातेवाइकांना लस शोधण्याची विनंती केली. गेल्या तीन-चार दिवसांपासून एकही लस मिळाली नाही. त्यामुळे आजार बळावला आहे.
- संगीता देशमाने-गोरडे, मखमलाबाद, नाशिक
——
वडिलांवर म्युकरमायकोसिसचे उपचार सुरू आहेत. रोजचे किमान दोन ते चार लसींचे डोस हवे आहेत. एका लसीची किंमत साडेसात हजार रुपये आहे. वणवण करून केवळ चार लस मिळाल्या आहेत. काळ्या बाजारातून घ्यायची तयारी असूनही लस मिळत नाही. सरकारने मागणीप्रमाणे रुग्णालयांना थेट लस पुरवावी.
- गणेश तुपे, हडपसर
——
औषधाच्या किमतीवर नियंत्रण आणा
घाऊक बाजारात ३,८०० रुपयांना मिळणारी लस ७ हजार ४०० रुपयांना खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे या उपचारासाठी किमान पंधरा लाख रुपये खर्च येऊ शकतो. सध्यातर लस उपलब्धच होत नाही. सरकारने लसीच्या दरांवर नियंत्रण ठेऊन त्याचा पुरवठा करावा, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे महानगर अध्यक्ष विजय सागर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
——